आरपीडी कॉलेजमध्ये भरला गावठी आठवडा बाजार

रानभाज्या आणि स्थानिक उत्पादनांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी|प्रतिनिधी : ग्रामीण संस्कृती, परंपरा आणि स्थानिक उत्पादनांचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी संचलित राणी पार्वतीदेवी ज्युनिअर कॉलेजतर्फे ‘रानभाजी व आठवडा बाजार’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘नवरंग कलामंच’ येथे पार पडलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दुपारी १२ ते २ या वेळेत भरलेल्या या गावठी आठवडा बाजारात कोकणातील निसर्गसंपन्न परिसरातून मिळणाऱ्या विविध रानभाज्या तसेच स्थानिक उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात आली. करटोली, टाकळा, अळंबी, पेवगा, शेपू यांसारख्या पौष्टिक रानभाज्यांसह अस्सल गावठी अंडी, गावठी तांदूळ, तांदळाचे लाडू, बेसन लाडू, ताजे दही आणि ताक यांसारख्या उत्पादनांना विद्यार्थ्यांनी पसंती दिली.

 

‘गावाचा अभिमान जपूया, स्थानिक उत्पादने वापरूया’ हा संदेश देणाऱ्या या उपक्रमात कॉलेजच्या सर्व वर्गांतील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष खरेदी-विक्रीचा अनुभव मिळाला, तसेच स्थानिक शेती, रानभाज्यांचे औषधी गुणधर्म आणि ग्रामीण जीवनशैलीची जवळून ओळख झाली.

 

या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, यावेळी राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.