प्रतिनिधी/ रोहन कांबळे
कोल्हापूर: आषाढी एकादशीचे औचित्य साधून कुर येथील संत बाळूमामा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘बाल दिंडी’ (बाल पायवारी) सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडला. या सोहळ्यामुळे संपूर्ण शाळा परिसर विठ्ठलमय झाला होता.
पारंपारिक पोशाख आणि गजर:
शाळेतील बाल वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन आणि विठ्ठल नामाचा जयघोष करत दिंडीत सहभागी झाले होते. मुलांचा भक्तिभाव उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.
विद्यार्थ्यांनी वारीचे महत्त्व सांगणारी प्रात्यक्षिके, पारंपरिक फुगड्या आणि मनमोहक ‘वारकरी नृत्य’ सादर करून संपूर्ण परिसर भक्तिरसपूर्ण करून टाकला.
शाळेचे प्राचार्य विजय देसाई यांच्या सुयोग्य मार्गदर्शनातून व नियोजनातून हा सोहळा साकारण्यात आला. त्यांच्या या उपक्रमामुळे चिमुकल्या वारकऱ्यांच्या बालमनावर संस्कृती व भक्तीची सुंदर पावले उमटली.
चौकट:
“संस्कृतीची जपवणूक आणि बालमनावर संस्कार घडवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे.”
— विजय देसाई (प्राचार्य)











