मसुरे | झुंजार पेडणेकर :हिंदळे ग्रामोन्नती मंडळ वाचनालय, हिंदळे येथे मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. पुस्तके ही आपले गुरू, मार्गदर्शक आणि मित्र असतात. ते आपल्यापुढे ज्ञानाचे भांडार उघडे करून आपल्याला योग्य दिशा व मार्गदर्शन दाखविण्याचे काम करतात म्हणूनच या दिवशी ग्रंथ प्रदर्शन आयोजित केले होते. यामध्ये धार्मिक, ऐतिहासिक, संदर्भ पुस्तके, गोष्टी, कथा, कादंबरी, कविता, इंग्रजी पुस्तके, अंक, वृत्तपत्र, मासिके ठेवण्यात आली होती.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री. सुनीलभाई पारकर यांनी पुस्तकांचे पूजन केले. पुस्तकांचे पूजन केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना भाई पारकर म्हणाले, पुस्तके ही मानवी आयुष्यातील सर्वोत्तम मार्गदर्शक असतात. आजच्या डिजिटल युगातही वाचनाची सवय टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. वाचनालयाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना उत्तम साहित्याची ओळख होण्यास मोठी मदत होईल.
यावेळी वाचनालय उपाध्यक्ष दयानंद तेली तसेच हिंदळे भंडारवाडा शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त असणाऱ्या पाद्यपूजा कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पालक, ग्रामस्थ, शिक्षक,वाचनालय पदाधिकारी, माजी शिक्षक, विद्यालयाचे सर्व शिक्षक व केंद्रप्रमुख श्रीमती जान्हवी लोके उपस्थित होत्या.
याप्रसंगी ग्रंथपाल सौ. मिताली हिर्लेकर यांनी ग्रंथ आणि पुस्तकांचे महत्त्व विशद करताना
ग्रंथ हेच आपले खरे मार्गदर्शक आणि गुरू आहेत. चांगल्या पुस्तकांचे वाचन माणसाचे विचार समृद्ध करते आणि त्याला योग्य दिशा दाखवते. वाचनालयातील या विविध प्रकारच्या ग्रंथांचा सर्वांनी, विशेषतः विद्यार्थ्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा आणि वाचनाची आवड जोपासावी असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला लिपिक प्रकाश बोरकर यांचेही सहकार्य लाभले. सर्व प्रमुख अतिथी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी यांचे वाचनालयाच्या वतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शेवटी शालेय मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.आभार ग्रंथापाल सौ.मिताली हिर्लेकर यानी मानले.












