‘आपके प्रस्ताव पर विचार करने हेतु प्रस्ताव बेलापूर अग्रेषित किया’
संगमेश्वर | प्रतिनिधी : नेत्रावती मत्स्यगंधा एक्सप्रेसला संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा देण्यासंदर्भातील प्रलंबित मागणीसंदर्भात कोकण रेल्वेच्या रिजनल मॅनेजर कार्यालयात संगमेश्वरवासीय प्रवाशांच्या वतीने निवेदन दिल्यानंतर कोकण रेल्वेने नेहमीप्रमाणे ठोकळेबाज उत्तर पाठवले आहे. कोकण रेल्वे मार्गे धावणार्या नेत्रावती-मत्स्यगंधा एक्सप्रेसला संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा देण्यासंदर्भात संगमेश्वरवासीय प्रवासी जनतेच्या वतीने निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या वतीने 19 डिसेंबर 2022 रोजी पुन्हा एकदा 26 जानेवारी रोजी होणार्या आमरण उपोषणासंदर्भातील निवेदन देण्यात आले. कोकण रेल्वेचे रत्नागिरी येथील क्षेत्रीय व्यवस्थापक रवींद्र कांबळे यांनी ते निवेदन स्वीकारले.
त्यानंतर दोन दिवसांनी (21 डिसेंबर) कोकण रेल्वेने नेहमीप्रमाणे आंदोलनाचा इशारा देणार्या संदेश जिमन यांना ‘आपका पत्र उचित कार्यवाही के लिए बेलापूर कार्यालय को अग्रेषीत किया गया है’, असे साचेबद्ध पत्र कोकण रेल्वेने पाठवले आणि दिनांक 26 जानेवारी 2023 रोजीच्या प्रस्तावित आंदोलनाबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. प्रत्येक वेळी कोकण रेल्वे प्रशासन वेगवेगळी कारणे देऊन वेळकाढूपणा करत असते. कोकण रेल्वे आंदोलनकर्त्यांना उत्तरादाखल पाठवलेल्या पत्राची प्रत कोकण रेल्वेने दिनांक 21 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी रत्नागिरी, जिल्हा पोलीस अधीक्षक रत्नागिरी तसेच संगमेश्वर तहसीलदारांना देखील पाठवली आहे. संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकातून वर्षाला करोडो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. तरी पण कोकण रेल्वेचे अधिकारी आमच्याशी दुजाभाव करत आहेत. कोकण रेल्वेने नेहमीप्रमाणे साचेबद्ध उत्तर पाठवले आहे. मात्र उग्र आंदोलन करूनच कोकण रेल्वे प्रशासनाला जाग येणार असेल तर आम्ही या गाड्यांना थांबा मिळेपर्यंत 26 जानेवारी रोजी होणार्या आमरण उपोषणावर आम्ही ठाम आहोत असे निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपचे प्रमुख
संदेश जिमन यांनी स्पष्ट केले.