पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांची भूमिका ठरली महत्त्वपूर्ण
कणकवली : गेली दोन वर्ष या – ना – त्या कारणाने प्रशासकीय फेऱ्यात अडकलेल्या व कणकवलीच्या पर्यटन विकासात मोठी भर टाकणाऱ्या कणकवली गणपती साना येथील बारमाही धबधब्याच्या कामाला अखेर पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून व नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याने २ कोटी ६० लाख ३३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीला प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आली आहे. कणकवली नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या संकल्पनेतून कणकवली गणपती साना या ठिकाणी कणकवलीच्या पर्यटन विकासात मोठी भर टाकणारा हा प्रकल्प करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र मध्यंतरीच्या काळात काही कारणाने या कामाला निधी मंजूर झाला नाही.
व त्यानंतर हे विकास काम प्रलंबित राहिले. कणकवली शहर विस्तारत असतानाच कणकवली शहरातील पर्यटन वाढीसाठी एक महत्त्वपूर्ण ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कणकवली गणपती साना येथे जलस्त्रोतांचे सौंदर्यकरण करणे या अंतर्गत धबधबा करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. जेणेकरून कणकवलीत येणाऱ्या पर्यटकांना जिल्ह्यात अन्य धबधब्या ऐवजी बारमाही हा धबधबा उपलब्ध व्हावा व यातून कणकवलीच्या पर्यटन विकासाला चालना मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर धरून हा हे काम प्रस्तावित करण्यात आले होते. गेली दोन वर्षाहून अधिक काळ हे काम प्रलंबित राहिले होते. दरम्यान आमदार नितेश राणे यांचे नुकतेच या प्रश्नी नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी लक्ष वेधले होते. त्यानुसार आमदार नितेश राणे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे याबाबत लक्ष वेधत पाठपुरावा करून या कामाकरिता तातडीने निधी मंजूर करून देत प्रशासकीय मान्यता देखील मिळवून दिली. जिल्हा नियोजन समितीच्या सचिव तथा जिल्हाधिकारी यांनी याबाबतचे प्रशासकीय मान्यतेचे आदेश दिले असून, कणकवली शहराच्या पर्यटन विकासात मोठा टप्पा पार करणारे हे काम अखेर मंजूर झाल्याने आता हे काम केव्हा सुरू होणार याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.