इन्सुली एक्साईजची कारवाई
बांदा : प्रतिनिधी
जुना पत्रादेवी-बांदा रोडवरील आरोसबाग तिठ्याजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाने धडक कारवाई करत गोव्यातून बेकायदा दारूची वाहतूक करणारी कार जप्त केली आहे. या कारवाईत ६ लाख ३१ हजार ७६० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुणे येथील कार चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
इन्सुली तपासणी नाक्याच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोसबाग तिठ्याजवळ संशयित वाहनांची तपासणी सुरू होती. पत्रादेवी मार्गे येणारी कार (क्र. MH-12-NE-9110) थांबवून पाहणी केली असता वाहनाच्या मागील सीटवर व डिकीमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे विविध ब्रँडचे २५ बॉक्स (एकूण २१२ बाटल्या) आढळून आले.
या कारवाईत २ लाख ८१ हजार ७६० रुपयांची दारू आणि साडे तीन लाखांची कार असा एकूण ६ लाख ३१ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चालक महेंद्र कैलास कोतवाल (वय ३६, ता. हवेली, जि. पुणे) याला ताब्यात घेण्यात आले असून महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, विवेक कदम, मिलिंद माळी, जवान संदीप कदम, दीपक वायदंडे, सागर सूर्यवंशी आणि सतीश चौगुले यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे करत आहेत.











