सिंधुदुर्गातील सुमारे 230 एनएचएम कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा मार्ग मोकळा; पालकमंत्री ना.नितेश राणे यांचे मानले आभार

सिंधुदुर्गातील सुमारे 230 एनएचएम कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा मार्ग मोकळा; पालकमंत्री ना.नितेश राणे यांचे मानले आभार

सिंधुदुर्ग : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अधिकारी व कर्मचारी संघटना, सिंधुदुर्गच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन राज्यातील 10 वर्षे व त्यापेक्षा अधिक काळ आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या 15,010 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अधिसंख्य पदांवर एकवेळची विशेष बाब म्हणून समायोजन करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.

संघटनेच्या शिष्टमंडळाने या निर्णयामुळे अनेक वर्षे कंत्राटी स्वरूपात सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाल्याचे सांगितले. माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या समायोजन प्रक्रियेला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे गती मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करून कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात आल्याबद्दल शिष्टमंडळाने कृतज्ञता व्यक्त केली.

15 ते 20 वर्षे आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना या निर्णयामुळे उज्ज्वल भविष्याची संधी उपलब्ध झाली असून हे ऋण कर्मचारी कधीही विसरणार नसल्याची भावना प्रतिनिधींनी व्यक्त केली. तसेच, समायोजनाचा निर्णय घेतल्याबद्दल संबंधित सर्वांचे अभिनंदन करून नियुक्ती आदेश लवकरात लवकर देण्याची विनंतीही करण्यात आली.

या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे 230 एनएचएम कर्मचाऱ्यांचे आरोग्य विभागात समायोजन होणार असून त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची विशेष उपस्थिती होती.

या भेटीप्रसंगी एनएचएम संघटनेचे अध्यक्ष हेमदिप पाताडे, अजित सावंत, रश्मी सोहनी, स्वाती जळवी, क्रांती तोरसकर, सागर चव्हाण, अंकिता तेली, दीपक रहाटे, आदिती चव्हाण, प्रसाद यादव, शारदा तावडे, नेहा अनवकर यांच्यासह 30 ते 40 एनएचएम कर्मचारी उपस्थित होते.