चिपळूण शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था; उत्तम दर्जाचा रस्ता शोधण्याची नागरिकांवर वेळ!

संतोष सावर्डेकर/चिपळूण:

चिपळूण शहरातील रस्त्याची इतकी दयनीय अवस्था झाली आहे की वाहन चालकांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही वर्षात शहरातील रस्त्यांची डांबरीकरण झाले. मात्र दर्जेदार रस्ते न झाल्याने या रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे. आता चिपळूण शहरात उत्तम दर्जाचा रस्ता शोधण्याची वेळ आली आहे. आता नव्याने निवडून आलेल्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांना चिपळूणवासियांना उत्तम दर्जाचे रस्ते दळणवळणासाठी बनवून देण्याचे आव्हान असणार आहे. आता नुकत्याच झालेल्या चिपळूण नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील अंतर्गत रस्त्याच्या खड्ड्यांवरून भाजप- ठाकरे सेनेच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी उडाल्याची पाहायला मिळाली. ही शाब्दिक खडाजंगी आगामी काळात चिपळूणवासियांसाठी उत्तम दर्जाचे रस्ते बनवण्यात सार्थकी लागावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

चिपळूण शहरातील रस्ते डांबरीकरणासाठी गेल्या काही वर्षात कोटी होती रुपयांचा निधी खर्ची पडला आहे. मात्र, अल्पावधीतच या रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे वेळोवेळी पाहायला मिळत आहे. आता तर चिपळूण शहरातील अंतर्गत रस्त्यांची इतकी दयनीय अवस्था झाली आहे की रस्ते खड्ड्यात की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या खड्ड्यांमधून वाहने चालवणे चालकांना जिकरीचे बनले आहे. पावसाळ्यात तर या खड्ड्यातील चिखलमय पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत असल्याने प्रसंगी एकमेकांमध्ये शाब्दिक खडाजंगी उडत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या पूर्वीच्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी दर्जेदार रस्ते बनवून घेण्याकडे लक्ष दिले असते तर ही वेळ आता आली नसती. आता तर चिपळूण शहरात उत्तम दर्जाचे रस्ते शोधण्याची वेळ आली आहे.

वीरेश्वर तलावानजिक ते नारायण तलाव, चिपळूण पोलिस ठाणे समोरून ते मध्यवर्ती एस. टी. स्टँड, वेस मारुती मंदिर ते जुना भैरी मंदिर, मुरादपूर रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता, भाजी मंडई नजीकचा रस्ता, वडार कॉलनी रस्ता, मार्कंडी, काविळतळी आदी भागातील रस्ते खड्डेमय बनले आहेत. मुरादपूर रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याची उंची वाढावी, यासाठी मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामात भराव कामासाठी सिमेंट काँक्रीटच्या प्लेट्सचा वापर केला जातो. त्या प्लेट्सचा वापर करण्यात आला आहे. परंतु उर्वरित रस्ता खड्डेमय बनला असल्याने या मार्गावरून ये-जा करणे अवघड होऊन बसले आहे. परंतु, रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी चिपळूणवासीयांना जवळचा मार्ग असल्याने नाईलाजास्तव या मार्गावरून ये-जा करावी लागत आहे.

तर दुसरीकडे चिपळूण शहरातून मुंबई – गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होत आहे. या चौपदरीकरण अंतर्गत बहादूरशेख नाका ते चिपळूण पंचायत समिती पर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मात्र, उड्डाणपूला खालील परिसर चिखलमय बनला आहे. या उड्डाणपुलाखालील महामार्गावरील शहराततील जोड रस्ते खड्डेमय बनले आहेत. हॉटेल शालोम, डीबीजे महाविद्यालय समोरील रस्ता, युनायटेड इंग्लिश स्कूल परिसरातील दोन्ही बाजूकडील रस्ते खड्डेमय बनले आहेत. तसेच महामार्गावरील देखील जोड रस्त्यावरील खड्ड्यानी आपले डोके वर काढले आहे. एकंदरीत, चिपळूण शहरातील उत्तम दर्जाचे रस्ते शोधण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

नुकत्याच झालेल्या चिपळूण नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील अंतर्गत खड्डेमय रस्त्यांचा विषय चांगलाच गाजला विशेष म्हणजे भाजप गटनेते शशिकांत मोदी यांनी ‘सुवर्ण भास्कर’ पेट्रोल पंपा समोरील खड्डे धोकादायक ठरत आहेत. वाहन चालकांना त्रास होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, ‘सुवर्ण भास्कर’ पेट्रोलपंपा समोरील खड्डे हा मुद्दा सातत्याने उपस्थित केल्याने शिवसेना उबाठा नगरसेवक निखिलेश उर्फ विकी नरळकर यांनी आक्षेप घेतल्याने शहरातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांचा विषय चांगलाच गाजला आणि या दोघांमध्ये शाब्दिक खडाजंगी उडाली. भविष्यात चिपळूण शहरातील दर्जेदार रस्ते होण्याच्या दृष्टीने नगराध्यक्षांसह नगरसेवकांना जागरुक रहावे, लागणार हे तितकेच खरे आहे.

चिपळूण शहर ‘स्मार्ट सिटी’ म्हणून बनवण्याचे उद्दिष्ट नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी बाळगले आहे. मात्र शहरातील दर्जेदार रस्ते झाले नाहीत. तर ‘स्मार्ट सिटी’ कशी बनणार हा देखील तितकाच प्रश्न महत्त्वाचा आहे. याचबरोबर चिपळूण शहरात पर्यटक वाढण्याच्या दृष्टीने नगराध्यक्षांसह नगरसेवकांना नवनवीन संकल्पना अमलात आणाव्या लागतील. यासाठी महायुती सरकारकडून तितका निधी आणण्याचे आव्हान देखील असणार आहे. नगराध्यक्ष उमेश सकपाळ चिपळूण शहराच्या विकासाच्या दृष्टीने शासनाकडून निधी आणण्यात यशस्वी ठरले. तर चिपळूण शहर स्मार्ट सिटी बनण्यात वेळ लागणार नाही. एकंदरीत नगराध्यक्षांसह नगरसेवकांना चिपळूण शहराच्या विकासात्मक दृष्टीने सध्या तरी आव्हान असल्याचे चित्र आहे.