रिंगणे येथील स्वामी समर्थ मठात २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव

​लांजा (प्रतिनिधी): तालुक्यातील रिंगणे येथील श्री स्वामी समर्थ मठात २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने मठात २६ ते २८ जुलै या कालावधीत ‘श्री गुरुचरित्र’ पारायण चालू असून २९ जुलै रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मठाधिपती रमेश हांदे यांनी दिली.
​रिंगणे येथे रमेश हांदे व सौ. उत्तरा हांदे या उभयतांनी सन २०१४ मध्ये स्वामी समर्थ मठाची स्थापना केली होती. तेव्हापासून आजपर्यंत सर्व स्वामीभक्तांच्या सहकार्याने मठात अविरतपणे स्वामी सेवा सुरू आहे. यंदा या सेवेचे १२ वे वर्ष आहे.
​ गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी, म्हणजेच २९ जुलै रोजी मठात सकाळी ८ वाजता श्रींचा अभिषेक,
९ वाजता होमहवन, ९:३० वाजता गुरूंच्या प्रतिमेचे पूजन, १० वाजता मानसपूजा, १०:३० वाजता सहस्र नामावली, ११:१५ वाजता नामजप तर ११:४५ वाजता मनोगत व मार्गदर्शन कार्यक्रम पार पडणार आहे.
​त्यानंतर दुपारी १२:३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६:३० वाजता आरती आणि रात्री ८:३० वाजता हरिनामाच्या गजरात भजनाचा कार्यक्रम रंगणार आहे.
​ रिंगणे परिसरातील तसेच तालुक्यातील भाविकांनी, स्वामीभक्तांनी या कार्यक्रमांचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रमेश हांदे व भक्तगणांच्या वतीने करण्यात आले आहे.