नाशिक ; बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत मुख्य आरोपी संजय गरुड याला सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील फार्महाऊसवरून अटक केली आहे. संजय गरुड हा भाजपचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.तपासात नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील तब्बल ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावांचा गैरवापर झाल्याचे उघड झाले आहे. तसेच आरोपीच्या ताब्यातील १५ शैक्षणिक संस्थांमधील १७७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बनावट वैयक्तिक मान्यता देण्यात आल्याचेही निष्पन्न झाले आहे.
बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप असून, आरोपीला दुपारी अडीच वाजता नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास नाशिक पोलीस अधिक खोलवर करत असून, आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.












