देवगडच्या पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त अभंग व भक्तीगीत गायन कार्यक्रम उत्साहात

देवगड, प्रतिनिधी : शिक्षण विकास मंडळ, देवगड संचलित श्रीमती नलिनी शांताराम पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त अभंग व भक्तीगीत गायन कार्यक्रम अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

 

कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल-रखुमाई यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ आदी संतांच्या अभंगांसह विविध भक्तिगीते सुरेल स्वरांत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या भावपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण सभागृह विठ्ठलनामाच्या गजराने भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सभापती श्री. एकनाथ तेली उपस्थित होते. यावेळी संस्थेचे कार्यवाह श्री. वैभव बिडये तसेच सहकार्यवाह श्री. तुकाराम तेली यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळते, असे सांगितले.

 

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. विजयकुमार कुनुरे, उपप्राचार्य प्रा. डॉ. पारस जाधव, पर्यवेक्षक प्रा. मिलिंद भिडे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

 

उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे कौतुक करत, अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव, नैतिक मूल्ये, संस्कार आणि भारतीय सांस्कृतिक परंपरेविषयी आदरभाव दृढ होतो, असे प्रतिपादन केले.

 

कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने केले. कार्यक्रमाची सांगता सर्व उपस्थितांनी एकमुखाने विठ्ठलनामाचा गजर करून अत्यंत भक्तिमय वातावरणात केली.