
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी दीर्घकाळ कार्यरत असलेले संजय आंग्रे उर्फ भाई आंग्रे यांची सेंट्रल रेल्वे स्थानीय लोकाधिकार सेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचे अध्यक्ष तथा माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांनी भाई आंग्रे यांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.
नियुक्तीनंतर भाई आंग्रे यांनी शिवसेना नेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि गजानन कीर्तिकर यांचे आभार मानत, संघटनेने त्यांच्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
भाई आंग्रे हे अनेक वर्षांपासून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवत आहेत. त्यांनी मध्य रेल्वे कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधित्व केले असून ‘सेंट्रल रेल्वे तिकीट चेकिंग परिवार’ या संस्थेचे नेतृत्वही ते करत आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छांचा वर्षाव केला.
आपल्या भावी कार्याचा आराखडा मांडताना भाई आंग्रे म्हणाले की, रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात अधिक चांगला समन्वय निर्माण करणे, कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे प्रभावीपणे संरक्षण करणे तसेच प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि लोकाभिमुख रेल्वे सेवा उपलब्ध होण्यासाठी सहकार्य करणे, हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असेल. स्थानिक लोकाधिकार सेना कर्मचाऱ्यांच्या हितासाठी पूर्ण बांधिलकीने कार्य करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच संघटना अधिक सक्षम आणि बळकट करत रेल्वे कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि जनहिताशी संबंधित सर्व प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नवनियुक्त कार्याध्यक्ष भाई आंग्रे यांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक सक्षम होईल आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हितासाठीची लढाई अधिक प्रभावीपणे पुढे जाईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.











