• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ
• बीएसएनएलच्या सॅटेलाईट फोनमुळे समुद्रातही राहणार अखंड संपर्क
• अधिकाधिक मच्छिमारांनी योजनेचा लाभ घ्यावा, मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे आवाहन
मुंबई : राज्यातील मच्छिमारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र शासनाने सॅटेलाईट फोन वाटपाच्या उपक्रमाला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून, मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत बीएसएनएलचे सॅटेलाईट फोन राज्यातील मच्छिमारांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली.
मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत नव्या सॅटेलाईट फोनबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. हे फोन समुद्राच्या कोणत्याही भागात कार्यरत राहतात. त्यामुळे समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमारांचा त्यांच्या कुटुंबीयांशी तसेच मत्स्य विभागाशी संपर्क कायम ठेवणे शक्य होणार आहे.
समुद्रात मासेमारीदरम्यान अपघात, वादळ किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास अनेकदा मच्छिमारांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटतो. त्यामुळे वेळेवर मदत मिळण्यात अडचणी येतात. सॅटेलाईट फोनमुळे अशा परिस्थितीत तातडीने संपर्क साधणे शक्य होईल. परिणामी बचावकार्य अधिक जलद होऊन मच्छिमारांचे प्राण वाचविण्यास मोठी मदत मिळणार आहे.
बीएसएनएलने विकसित केलेले हे सॅटेलाईट फोन मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून राज्यातील जास्तीत जास्त मच्छिमारांपर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र मच्छिमारांना सॅटेलाईट फोन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
राज्यातील अधिकाधिक मच्छिमारांनी मत्स्य विभागाशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केले. प्रत्येक मच्छिमाराकडे सॅटेलाईट फोन उपलब्ध झाल्यास समुद्रातील आपत्कालीन परिस्थितीत त्यांची सुरक्षितता वाढण्याबरोबरच वेळेवर मदत पोहोचविणे अधिक प्रभावी होईल आणि अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.











