संपादकीय : दिशाचे मारेकरी एसआयटीच्या रडारवर

Google search engine
Google search engine

इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर : अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सॅलियन यांचा मृत्यू जून २०२० मध्ये अवघ्या सहा दिवसांच्या अंतराने झाला. अडीच वर्षे झाली तरी त्यांच्या मृत्यूचे गूढ उकलेले नाही. त्यांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहेत, त्यांचे मारेकरी कोण आहेत, त्यांना कशामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले याची उत्तरे आजवर मिळालेली नाहीत. विशेषत: दिशाचा मृत्यू अपघाती आहे व उत्तुंग इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडल्याने झाला यावर सामान्य जनताही विश्वास ठेवायला तयार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सत्य उकलून काढण्यासाठी एसआयटी (विशेष तपास पथकांची)ची नेमणूक करण्याची घोषणा केली, तर त्यात अस्वस्थ होण्यासारखे काय आहे?
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे चालू आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन शुक्रवारीच संस्थगित झाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांनी गेल्या आठवड्यात लोकसभेत याच मुद्द्यावर आवाज उठवला. आजपर्यंत संसदेत दिशा व सुशांत यांच्या मृत्यू प्रकरणावर केंद्र सरकारकडे कोणी विचारणा केली नव्हती. पण राहुल शेवाळे यांच्या प्रश्नाने केंद्र सरकारचे लक्ष या संवेदनशील विषयाकडे वेधले गेले. केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे हे तिघेही दिग्गज नेते दिशा सॅलियनच्या मृत्यूवर सातत्याने आवाज उठवत आहेत. तीनही नेते म्हणजे क्रुसेडर आहेत. दिशावर अत्याचार झाला, तिची हत्या झाली असे ते वारंवार सांगत आहेत. त्या रात्रीच्या पार्टीला तिथे ठाकरे सरकारमधील कोण मंत्री गेला होता अशी ते सातत्याने विचारणा करीत आहेत. सोसायटीच्या व्हिजिटर्स बुकमधील त्या दिवशीची पाने कशी फाडली गेली असाही प्रश्न त्यांनी अनेकदा विचारला आहे. अर्थात ठाकरे सरकार असताना या प्रश्नांची उत्तरे कधीच मिळाली नाहीत. उलट सीबीआयने तपासात क्लीनचिट दिली आहे, असे चित्र महाआघाडीच्या नेत्यांनी भासवले. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार भरत गोगावले यांनी दिशाच्या मृत्यूचा मु्द्दा विधानसभेत उठवला आणि भाजपचे लढाऊ आमदार नितेश राणे, अमित साटम, माधुरी मिसाळ व देवयानी फरांदे यांनी तो लावून धरला. शिवसेना उबाठा व त्या पक्षाच्या नेत्यांनी या सर्व प्रकरणाची सीबीआयने चौकशी केली असून दिशाचा मृत्यू अपघाती आहे, असा निष्कर्ष काढून फाईल बंद केली आहे असा प्रचार केला. एवढेच नव्हे तर तिच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयने कोणालाही जबाबदार धरलेले नाही, असेही उबाठा गटाने सांगण्याचा प्रयत्न केला. दिशा ही सुशांत राजपूतची टॅलेंट मॅनेजर होती. पण तिच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे, हे मात्र आजतागायत पुढे आले नाही.
राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केलेल्या मागणीचा उल्लेख करून नितेश राणे यांनी शिवसेना उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी म्हणजे सत्य बाहेर येईल अशी मागणी करून थेट मातोश्रीला हादरा दिला. शेवाळे यांनी लोकसभेत बोलताना सीबीआय चौकशी कुठपर्यंत आली असा प्रश्न विचारून या प्रकरणात महाविकास आघाडीचा प्रभावशाली नेता गुंतलेला आहे असाही आरोप केला. एयू या सांकेतिक नावाने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ४४ कॉल्स आले व बिहार पोलिसांच्या अहवालात एयू म्हणजे आदित्य ठाकरे असा उल्लेख आहे, असा गौप्यस्फोटही शेवाळे यांनी केला. राहुल शेवाळे यांनी लोकसभेत उठवलेला दिशाच्या मृत्यूचा मुद्दा व राणे, साटम आदींनी विधानसभेत केलेली आक्रमक मागणी त्यामुळेच राज्य सरकारने एसआयटी चौकशीची घोषणा केली. फडणवीस यांनी एसआयटीची घोषणा करताच महाआघाडीने सरकारची कोंडी करायचा प्रयत्न केला. सीबीआयने आपघाती मृत्यू असे म्हटले असताना पुन्हा एसआयटी हवीच कशाला, यावरून गदारोळ केला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला, त्याची एसआयटी चौकशी करा, ठाण्याचे बिल्डर सुरज परमार यांनी केलेल्या आत्महत्येची व त्यांनी लिहून ठेवलेल्या डायरीतील नोंदींची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी करणाऱ्या महाआघाडीचे नेते कसे सैरभैर झाले आहेत, हेच दिसून आले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ८३ कोटींचे भूखंड २ कोटी रुपयांत बिल्डर्सना दिले म्हणूनही महाआघाडीने गोंधळ घालून बघितला. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दीडशे कोटींचा जमीन घोटाळा केला म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करीत थयथयाट केला. पण अशा मागण्यांमुळे दिशाच्या मृत्यूच्या एसआयटी तपासाचे गांभीर्य कमी होणार नाही. अमरावतीचे फार्मासिस्ट उमेश कोल्हे यांनी भाजपच्या नेत्या नूपुर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन केल्याची पोस्ट मीडियावर टाकली. त्यांनी हिंदू धर्माचा प्रसार केला म्हणून त्यांना धमक्या दिल्या गेल्या. सार्वजनिक ठिकाणी त्यांची हत्या झाली. हत्येची गंभीर घटना असताना दरोडा आहे असे समजून तपास करा असा पोलिसांवर दबाव कोणी आणला, याचेही उत्तर चौकशी झाल्यावर मिळू शकेल. महाआघाडी सरकारने अडीच वर्षांत जो ‘हम करे सो कायदा’ कारभार केला, त्याची लक्तरे आता कुठे टांगली जाऊ लागली आहेत.
आदित्य ठाकरे यांना त्रास देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने एसआयटी नेमली असे महाआघाडीने आरोप केले. पण सीबीआयने दुसऱ्याच दिवशी दिशा सॅलियन प्रकरणाचा आम्ही तपास केलेला नाही किंवा त्याचा तपास आमच्याकडे कोणी दिलेला नाही, असे स्पष्टीकरण केल्याने शिवसेना उबाठाचे नेते अक्षरश: तोंडघशी पडले. नंतर सीबीआय हा शब्द उच्चारायचीही कोणी हिम्मत केली नाही. सीबीआयने केस बंद केली आहे, या प्रकरणाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये असे विरोधी पक्षनेते अजित पवार कशाच्या आधारावर सांगत होते? रिया चक्रवर्तीला एयू या नावाने आलेले फोन नेमके कोणाचे याचे उत्तर इतके दिवस मिळत नव्हते. एयू म्हणजे अनन्या उद्धव असे सांगण्यात येत होते. पण रियाच्या मृत्यूनंतर सुशांत त्याच्या घरी गळफास लावून आत्महत्या करतो, याचे गूढ अजून उकलेले नाही.
दिशाचा मृत्यू झाला त्या दिवशी आपण आपल्या आजोबांचा मृत्यू झाला म्हणून दवाखान्यात होतो, असा खुलासा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. म्हणजेच तिच्या मृ्त्यूच्या वेळी आपण तिथे नव्हतो असे आदित्य यांना सांगायचे असावे. दिशाचा मृत्यू ८ जून २०२० रोजी झाला, सुशांतचा मृत्यू १४ जून २०२० रोजी झाला. आदित्य यांचे आजोबा माधवराव पाटणकर (रश्मी ठाकरे यांचे वडील) यांचे १५ जून २०२० रोजी अंधेरीच्या इस्पितळात निधन झाले. पाटणकर यांच्या निधनानंतर अजित पवार, सुप्रिया सुळे, राज्यपालांनी दुखवटा संदेशही पाठवला होता. दिशाच्या मृत्यूनंतर सात दिवसांनी आदित्य यांच्या आजोबांचा मृत्यू झाला. मग आदित्य असे का सांगतात….
जमीन घोटाळा झाला असा ओरडा करीत एकनाथ शिंदे आणि अब्दुल सत्तार यांनी राजीनामे द्यावेत, अशीही महाआघाडीने जोरदार मागणी केली. पण राज्यात महाआघाडी सत्तेवर असताना अनिल देशमुख व नबाब मलिक असे दोन कॅबिनेट मंत्री जेलमध्ये गेले. ठाकरे सरकार कोसळेपर्यंत मलिक यांचा राजीनामा घेण्यात आला नव्हता. जेलमध्ये असूनही मलिक मंत्रीपदावर होते, असे उदाहरण राज्यात प्रथमच घडले. अशा महाआघाडीला कोणा मंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार तरी पोहोचतो का?
राणे कुटुंबीय दिशा सॅलियनच्या मृत्यूचा मुद्दा कशाचीही पर्वा न करता सातत्याने धडाडीने मांडत आहे. ठाकरे सरकारच्या काळात राणे कुटुंबीयांना पोलिसांची फौज वापरून कसा त्रास दिला गेला हे राज्यातील बारा कोटी जनतेने टीव्हीच्या पडद्यावर बघितले. राणेंनी जिद्दीने केलेला पाठपुरावा अखेर कामी आला. एसआयटी चौकशीनंतर सत्य बाहेर येऊ शकेल व कोणी कोणी वास्तव दडपण्याचा प्रयत्न केला हेही स्पष्ट होईल. खोके सरकार म्हणून रोज घोषणा देऊन शिंदे-फडणवीस सरकारला हिणवणाऱ्या महाआघाडी नेत्यांची एसआयटीमुळे गोची झाली आहे.
[email protected]
[email protected]