#
‘तहसीलदार’ असल्याचे सांगत १५ हजार रुपयांचे आमिष; करोनासारख्या आजाराची भीती दाखवून गावकऱ्यांची दिशाभूल
सरकारी अधिकारी कधीच आले नाहीत; फोन बंद झाल्यानंतर फसवणुकीचा उलगडा, पोलिसांचा तपास सुरू
तामिळनाडूतील सालेम जिल्ह्यात सरकारी योजनेच्या नावाखाली अत्यंत धक्कादायक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःला तहसीलदार असल्याचे सांगणाऱ्या एका भामट्याने करोनासारखा नवीन संसर्गजन्य आजार पसरत असल्याची भीती दाखवत मुंडण केल्यास १५ हजार रुपये मिळतील, असे आमिष दाखवले. या खोट्या दाव्यावर विश्वास ठेवून तीन महिलांनी आपले केस काढले. नंतर कोणतीही सरकारी योजना नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आपण फसवणुकीला बळी पडलो असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणाचा अत्तूर ग्रामीण पोलीस तपास करत असून फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.
चेन्नई : तामिळनाडूच्या सालेम जिल्ह्यातील एका गावात सरकारी योजनेच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वतःला तहसीलदार म्हणून ओळख सांगणाऱ्या एका भामट्याने करोनासारखा नवीन आजार पसरत असल्याचा दावा करत, मुंडण केल्यास आजारापासून संरक्षण मिळेल आणि सरकारकडून १५ हजार रुपयांचे अनुदान मिळेल, असे सांगितले. या अफवेवर विश्वास ठेवून तीन महिलांनी मुंडण केले.
ही घटना सालेम जिल्ह्यातील अत्तूरजवळील पुथुकोथमपाडी गावात घडली. रविवारी रात्री गावातील रहिवासी पलनियाम्मल यांच्या मोबाईलवर फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख अत्तूर तालुका कार्यालयातील तहसीलदार अशी करून दिली. त्याला केवळ संबंधित महिलेचेच नव्हे, तर तिच्या कुटुंबातील सदस्यांचीही माहिती असल्याने त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला.
भामट्याने दावा केला की कोविड-१९ प्रमाणेच एक नवीन संसर्गजन्य आजार केसांमधून पसरत आहे. या आजारापासून बचाव करण्यासाठी परदेशात लोक मुंडण करत असल्याचे त्याने सांगितले. तसेच तामिळनाडू सरकार मुंडण करणाऱ्या महिलांना १५ हजार रुपये, विद्यार्थ्यांना ४५ हजार रुपये व लॅपटॉप आणि पुरुषांना ६ हजार रुपये देणार असल्याचा खोटा दावा करण्यात आला.
याशिवाय गावासाठी केवळ १८ टोकन्स उपलब्ध असल्याचे सांगून दुसऱ्या दिवशी दुपारी सरकारी अधिकारी पैसे घेऊन येतील, असेही सांगण्यात आले. मात्र, पैसे मिळण्यासाठी आधी मुंडण केलेले असणे आवश्यक असल्याची अट घालण्यात आली. ही माहिती गावभर पसरल्यानंतर अनेकांनी मुंडण करण्याची तयारी सुरू केली. त्यापैकी ५६ वर्षीय कावेरी, ५८ वर्षीय रामायी आणि ६० वर्षीय चित्रा यांनी तातडीने आपले केस काढून टाकले.
दुपार उलटून संध्याकाळ झाली तरी कोणताही सरकारी अधिकारी किंवा वाहन गावात आले नाही. संशय आल्याने महिलांनी त्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो फोन बंद असल्याचे आढळले. त्यानंतर आपण फसवणुकीचे बळी ठरलो असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेनंतर गावातील इतर नागरिकांनी मुंडण न करण्याचा निर्णय घेतला.
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर अत्तूर ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविणे, तसेच गावकऱ्यांची वैयक्तिक माहिती त्याच्यापर्यंत कशी पोहोचली, याचा शोध घेतला जात आहे.











