नवी मुंबईत युनिकॉर्न बालविकास केंद्राचा शुभारंभ

नवी मुंबई : युनिकॉर्न म्हणजे नवनिर्मितीचे स्वातंत्र्य, नवीन अस्तिव निर्माण करण्याची संधी आहे आणि म्हणूनच भारताच्या ७६ व्या स्वातंत्र्य दिनी कोकण संस्थेच्या वतीने पनवेल येथे आदई गावात युनिकॉर्न बालविकास केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. या आश्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग खांडेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी विजया वाळके या कार्यकर्तीच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून सर्वांनी शिवरायांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करत राहू अशी शपथ घेतली.

शिवरायांना डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक मुलाने यश प्राप्त केले पाहिजे आणि म्हणूनच दिन दुबळ्या, निराधार बालकांच्या संगोपनाच्या कामाची सुरुवात अशाप्रकारे मुलांची जबाबदारी घेऊन करावे या विचारांनी कोकण संस्थेच्या माध्यमातून आज युनिकॉर्न बालविकास केंद्राची सुरुवात करण्यात आली, असे दयानंद कुबल यांनी सांगितले.
कोरोनाने भारतातील लाखो मुलांना अनाथ केले, करोडो लोकांना उपसमारीला सामोरे जावे लागले आणि लाखो नोकऱ्या गेल्या तसेच कित्येक लोकांना मानसिक ताप सहन करावा लागला.केंद्र आणि राज्य सरकारने आपल्या परीने सर्वाना मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, अनाथ मुलांना आर्थिक मदत करायची घोषणा पण झालीय पण अजून ही बरीच अशी मुले आहेत ज्यांच्या घरचा कमावता व्यक्ती गेला, आणि कित्येकांनी आई वडील पण गमावले.

अशा जास्तीत जास्त गरजू मुलांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून आश्रमाची सुरुवात करण्यात आली असून येथे ३० मुलांचे संगोपन केले जाणार आहे.संस्थेने आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना मदत केली असून, ज्यांची काळजी घ्यायला कोणी नाही अशा नवी मुंबई, आणि मुंबईतील मुलांसाठी युनिकॉर्न या आश्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या आश्रमातील प्रत्येक मुलाच्या आरोग्य, शिक्षणाबरोबर त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी संस्था संपूर्ण पुढाकार घेणार आहे. या शुभारंभ प्रसंगी संस्थाध्यक्ष दयानंद कुबल, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग खांडेकर, प्रकल्प व्यवस्थापक सुरज कदम, प्रीती पांगे, साक्षी पोटे, योगिता निजामकर, संतोष दोखे, कोमल कांबळे, सलीना बुटेलो, सुनंदा मोरे, हर्षला अमूप, सुजित कदम, रोशन राणे, किशोर नाईक, श्वेता चोरगे आणि मुले उपस्थित होती.