रत्नागिरी जिल्ह्यात गॅस टँकर अपघातांवर नियंत्रणासाठी पोलीस अधीक्षकांची सुरक्षा बैठक

रत्नागिरी : 

रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा आणि निवळी येथे वारंवार होणाऱ्या एलपीजी गॅस टँकर अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नितीन भाटे यांच्या अध्यक्षतेखाली 4 ऑगस्ट रोजी “महामार्ग सुरक्षा बैठक” घेण्यात आली. या बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी, गॅस कंपन्यांचे प्रतिनिधी, रस्ते कंत्राटदार, एनएचएआय अधिकारी, आरटीओ अधिकारी तसेच JSW ग्रुप, ईशिल इन्फ्रा लिमिटेड, ब्लूम कंपनी, कॉन्फिडन्स पेट्रोलियम आदी कंपन्यांचे प्रोजेक्ट मॅनेजर्स आणि ग्रामीण व शहर पोलीस ठाण्यांचे प्रभारी उपस्थित होते.

बैठकीत गॅस टँकरच्या सुरक्षेसंदर्भात महत्त्वाचे निर्णय व सूचना देण्यात आल्या. यामध्ये –

  • गॅस टँकर चालकांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी
  • वाहन चालवताना मोबाईलचा वापर बंदी
  • चालकांना सुरक्षित वाहतूक व हाताळणीचे प्रशिक्षण
  • मद्यपान करून वाहन चालवण्यास सक्त मनाई
  • टँकर ताफा सुरक्षित अंतर व कमाल 20 किमी वेगासह एस्कॉर्टमध्ये नेणे
  • चालकांना गणवेश, सहाय्यक चालक, आणि नियमित ड्रायव्हिंग चाचणी
  • टँकरच्या व्हॉल्व्ह व फ्रेम डिझाइनमध्ये सुधारणा
  • हातखंबा येथे बचाव वाहन व प्रशिक्षित पथकाची उपलब्धता
  • चालकांना इमर्जन्सी संपर्क क्रमांक

तसेच एनएचएआय आणि आरटीओ अधिकाऱ्यांना

  • रस्त्यावर योग्य ठिकाणी सुरक्षा चिन्हे व फलक
  • रस्त्यांचे दर्जेदार डांबरीकरण
  • अपघातग्रस्त ठिकाणी स्पीड ब्रेकर
  • चालकांसाठी जनजागृती कार्यक्रम
  • गॅस टँकरची अचानक तपासणी, ओव्हरलोडिंग आणि मद्यपान करणाऱ्यांवर कडक कारवाई

ही उपाययोजना राबवून जिल्ह्यातील गॅस टँकर अपघातांवर आळा घालण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे.