संस्कार भारतीतर्फे गुरुवंदना कार्यक्रमात ज्येष्ठ कवी अरुण इंगवले यांचा सन्मान व मुलाखतीचे आयोजन

ज्येष्ठ लेखक सुमेध वडावाला (रिसबुड ) यांची उपस्थिती
चिपळूण (वार्ताहर) : चिपळूणच्या कलाक्षेत्रात विविध कार्यक्रमांचे नेहमी यशस्वी आयोजन करणाऱ्या संस्कार भारती उत्तर रत्नागिरी समितीतर्फे यंदा नटराज पूजन आणि गुरुवंदना कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी अरुण इंगवले यांचा गुरुवंदना म्हणून सन्मान करण्यात येणार असून त्यांच्या प्रकट मुलाखतीचेही आयोजन करण्यात आले आहे.
अरुण इंगवले यांच्या “आबुट घेऱ्यातील सूर्य “ या काव्यसंग्रहास अनेक पुरस्कार लाभले आहेत. अरुण इंगवले हे ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी असून तिल्लोरी भाषेमध्ये त्यांनी संशोधन करून सुमारे दोन ते अडीच हजार शब्दांचा संग्रह केला आहे. ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोकण विभागाचे बिनविरोध निवडून आलेले प्रतिनिधी आहेत . त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक कवीनी आपले कवितासंग्रह प्रसिद्ध केले आहेत. चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे अरुण इंगवले हे कार्याध्यक्ष आहेत. संस्कार भारतीतर्फे नटराज पूजन आणि गुरुवंदना कार्यक्रमाच्या निमित्ताने दरवर्षी एका क्षेत्रातील गुरूतुल्य व्यक्तिमत्त्वाचा सन्मान केला जातो. यावर्षी ज्येष्ठ साहित्यिक सुमेध वडावाला (रिसबुड) यांचे हस्ते माननीय अरुण इंगवले यांचा सन्मान करण्यात येणार असून संस्कार भारती तर्फे त्यांना मानपत्र देण्यात येणार आहे.
सुमेध वडावाला (रिसबुड) यांचे विचार ऐकण्याची संधीही रसिक श्रोत्यांना मिळणार आहे. याबरोबरच जेष्ठ प्रवचनकार लेखिका सौ. अंजली बर्वे या अरुण इंगवले यांची मुलाखत घेणार असून त्यांचा सर्व साहित्यिक प्रवास मुलाखतीतून उलगडणार आहेत. असा हा अतिशय श्रवणीय असा कार्यक्रम संस्कार भारती उत्तर रत्नागिरी समितीतर्फे रविवार दि. २ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ब्राह्मण सहाय्यक संघाच्या बेडेकर सभागृहामध्ये वीरेश्वर कॉलनी चिपळूण येथे संपन्न होणार आहे. तरी चिपळूणमधील सर्व जाणकार रसिकांनी, साहित्यप्रेमींनी आणि काव्यप्रेमीनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संस्कार भारती उत्तर रत्नागिरी महामंत्री मंगेश बापट आणि अध्यक्ष शरद तांबे यांनी केले आहे .