नामदेव शंकर कावले स्कूल आचरेच्या विद्यार्थ्यांना दिवाळी अंकांचे वितरण
आचरा-अर्जुन बापर्डेकर
साने गुरुजी कथामाला मालवण यांच्यावतीने ‘नामदेव शंकर कावले इंग्लिश मीडियम स्कूल आचरा’ येथे प्रतिवर्षी होणारा कथामालेचाअक्षरदान उपक्रम साजरा झाला. सदर शाळेतील बालकुमाराना (इयत्ता ८वी ,९वीच्या विद्यार्थ्यांना) साधना साप्ताहिकाचे बालकुमार दिवाळी अंक मोफत दिवाळी भेट म्हणून देण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश गावकर (प्रमुख कथामाला सल्लागार) तर मार्गदर्शक म्हणून सुगंधा केदार गुरव (कार्यवाह कथामाला )या होत्या .तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मायलीन फर्नांडिस आणि लोकल स्कूल कमिटी सदस्य मंदार सांबारी ,परेश सावंत हे उपस्थित होते. प्रतिवर्षी सौ. सुमेधा सदानंद कांबळी चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने* अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवणच्या वतीने ‘मालवण तालुक्यातील एका शाळेतील बालकुमार वाचकांना ही अक्षर भेट प्रदान करण्यात येते. यावर्षी निवड समितीकडून ‘नामदेव शंकर कावले इंग्लिश मीडियम स्कूल आचरे ‘या शाळेची निवड , सुरेश शामराव ठाकूर (अध्यक्ष अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण) यांच्याकडून करण्यात आली होती. प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका मायलीन फर्नांडिस यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले . त्यानंतर सुगंधा केदार गुरव यांनी,’साने गुरुजी कथामालेच्या गेल्या पन्नास वर्षातील’ विविध उपक्रम आणि वाटचालींचा आढावा घेतला .त्यात कथाकथन स्पर्धांपासून पाणपोई उपक्रमापर्यंत आणि आरोग्य शिबिरांपासून सानेगुरुजी संस्कारपरीक्षेपर्यंत मुलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध पंचवीस उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर सदर अक्षरदान योजनेचे पुरस्कर्ते श्री सदानंद कांबळी यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले.
आपल्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सुरेश गावकर यांनी साधनाचा बालकुमार दिवाळी अंक २०२६ कसा वाचनीय आहे; हे बालकुमाराना सांगितले. ते म्हणाले, भारतातील सहा भाषांतील सहा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखकांच्या सुंदर सुंदर कथा या अंकात आहेत .पन्नालाल पटेल( गुजराती ),दामोदर मावजो (कोकणी), द.रा.बेंद्रे (कन्नड), अमरकांत (हिंदी) डी.जयकांतन(तमिळ)आणि कॅरेल कॅफेक(इंग्रजी) या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिकांच्या कथा मराठी सारस्वत, विश्वास पाटील, शैला मावजो ,द्वारकानाथ अरवंदेकर ,चंद्रकांत भोंजाळ, मानसी केळकर आणि वि. स .खांडेकर* यांनी अनुवादित आणि रूपांतरित केलेल्या आहेत. दिवाळीपूर्वी तुमच्या हातात दिलेले अक्षरखाऊ केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या कुटुंबीयांसाठी खमंगदार असा फराळ आहे. त्याचा लाभ तुमच्या सर्व कुटुंबीयांनी घ्यावा अशी माझी अपेक्षाआहे.
यावेळी मंदार सांबारी म्हणाले, ‘साने गुरुजींनी तुम्हा मुलांसाठी अनेक संस्कारीत कथा लिहिलेल्या आहेत. गेल्या शतकात लिहिलेले हे साहित्य पुढील अनेक शतकांतील मुलांसाठी अक्षरखजिनाच आहे; तर परेश सावंत म्हणाले, इंग्रजी माध्यमाच्या मुलांना दिवाळीपूर्वी हे अक्षरदान करून कथामालेने वाचन संस्कृती वाढविण्यासाठी राबविलेला अभिनव उपक्रम खरोखर स्तुत्य असाच आहे.
कोकण मराठी साहित्य परिषद मालवणचेही अक्षरदान
यावेळी शाळेतील शिक्षकांच्या वाचनालयासाठी कोकण मराठी साहित्य परिषद मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर लिखित ‘शतदा प्रेम करावे’,’शब्दांच्या पलीकडले’ , तर संपादित ‘सिंधू साहित्यसरिता, (चरित्रात्मक) , बीज अंकुरे अंकुरे (ललित), ये ग ये ग सरी (काव्य) आणि को. म . सा.प.सदस्या उज्वला धानजी लिखित ‘आठवणींच्या हिंदोळ्यावर’ ही पुस्तके अक्षरभेट म्हणून देण्यात आली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता खेडेकर यांनी केले तर आभार शीतल केरकर यांनी मानले. यावेळी शाळेतील शिक्षिका सीमा पुजारे, रुपाली पाटकर या उपस्थित होत्या.














