गुरुपौर्णिमेनिमित्त ‘गुरूंच्या चरणी हरित वंदन’ उपक्रम

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा परिसरात १०१ तुळशी रोपांची लागवड

सावंतवाडी : गुरुपौर्णिमेचा पवित्र उत्सव यंदा निसर्गाशी जोडत सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा, सावंतवाडी (कळसुलकर शाळा) येथे “गुरूंच्या चरणी हरित वंदन” हा अभिनव उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात १०१ तुळशीच्या रोपांची लागवड करून हरित संकल्प साकारला.

उपक्रमाच्या प्रारंभी शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री. डी. जी. वरक यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व समजावून सांगितले. बदलत्या काळात गुरुचे स्थान किती महत्त्वाचे आहे, याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तुळशीचे पर्यावरणीय, औषधी आणि धार्मिक महत्त्व पटवून दिले. वातावरण शुद्ध ठेवण्यास मदत करणारी आणि प्राणवायूच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारी तुळस प्रत्येक घरात आणि परिसरात असणे आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. तुळशीची लागवड करण्याबरोबरच तिचे नियमित संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारीही विद्यार्थ्यांनी स्वीकारली.

कळसुलकर शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी उत्साहाने १०१ तुळशीची रोपे लावत पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली.

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रदीप सावंत, हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. सूर्यकांत भुरे, शाळेतील शिक्षक श्री वरक सर, कांबळे सर, गुंजाळ मॅडम, बिले मॅडम, राऊळ मॅडम, आडेलकर मॅडम, घाडीगावकर मॅडम, समस्त विद्यार्थी, पालक तसेच हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित पालकांनी या अभिनव उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.

यावेळी पालक प्रतिनिधी सौ. पूजा अरवारी यांनी विद्यार्थ्यांसाठी खाऊचे वाटप करून उपक्रमात आनंदाची भर घातली. त्यांच्या या सहकार्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूंबद्दलचा आदर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, “गुरूंचा आशीर्वाद आणि निसर्गाची साथ – हरित भविष्यासाठी एक छोटासा प्रयत्न” हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यात शाळेला यश आले.