माजगाव येथे उमेद अभियानांतर्गत विविध उपक्रम; उत्कृष्ट कार्याचा गौरव
सावंतवाडी :महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत माजगाव येथील सिद्धिविनायक हॉलमध्ये शुक्रवारी, २४ जुलै रोजी शिवम प्रभागसंघ, माजगावची आर्थिक वर्ष २०२५-२६ ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली.
सभेची सुरुवात प्रार्थना आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. तसेच स्वयंसहायता समूहांनी लावलेल्या विविध प्रकारच्या स्टॉल्सचे उद्घाटन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सभेचे अध्यक्षस्थान प्रभागसंघ अध्यक्ष मंजिरी गावकर यांनी भूषविले. उपस्थित सर्व मान्यवर व कार्यकारी समिती सदस्यांचे प्रभागसंघाच्या वतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रीटीना यांनी प्रास्ताविक सादर केले, त्यानंतर मागील सभेचे इतिवृत्त वाचून ते कायम करण्यात आले. प्रभागसंघाच्या कोषाध्यक्षांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ चा जमा-खर्च व उत्पन्न विवरण स्पष्ट केले, ज्यास उपस्थितांनी मान्यता दिली. या प्रसंगी शिवम प्रभागसंघ, माजगावच्या आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या वार्षिक अहवालाचे अनावरण कॅनरा बँकेचे व्यवस्थापक मोहित सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. कोषाध्यक्षांनी पुढील २०२६-२७ या वर्षाचा ताळेबंद व अंदाजपत्रक सादर केले. तसेच पुढील पाच वर्षांचे ध्येय निश्चित करताना संकल्प चित्र, प्रभागसंघाचा वार्षिक कृती आराखडा व व्यवसाय विकास आराखडा स्पष्ट करून त्यास मान्यता घेण्यात आली.
या सभेदरम्यान आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उत्कृष्ट कार्य करणारे समूह, उत्पादक समूह, वैयक्तिक लाभार्थी तसेच पंचायत राज संस्था व समुदाय आधारित संस्थांच्या सहकार्यातून स्थापन झालेल्या बालसभेच्या पदाधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
मार्गदर्शन करताना सावंतवाडी तालुका अभियान कक्षाच्या स्वाती रेडकर यांनी सामाजिक समावेशन, लखपती दीदी आणि शाश्वत उपजीविका या विषयांवर मार्गदर्शन केले. सभेचे प्रमुख पाहुणे जिल्हा अभियान व्यवस्थापक वैभव पवार यांनी प्रभागसंघाच्या भविष्यातील धोरणांवर मोलाचे मार्गदर्शन करत प्रभागसंघाच्या पुढील वाटचालीस व कामास शुभेच्छा दिल्या.
या वार्षिक सभेस प्रभागसंघ सचिव राधा गावडे, कोषाध्यक्ष रुपाली तारी, जिल्हा अभियान व्यवस्थापक वैभव पवार, जिल्हा व्यवस्थापक निलेश वालावलकर, तालुका अभियान कक्षातील स्वाती रेडकर, तालुका माहिती प्रणाली व्यवस्थापक शिवानंद गवंडे, तालुका समावेशन व्यवस्थापक रिधिमा पाटकर, प्रभाग समन्वयक सुनिता मेस्त्री, जिल्हा संरक्षण अधिकारी (महिला बालकल्याण विभाग) पुरुषोत्तम पाटील व सीमा साळगावकर, कॅनरा बँक सावंतवाडी शाखेचे व्यवस्थापक मोहित सिंह, महाराष्ट्र ग्रामीण बँक माजगाव शाखेचे व्यवस्थापक सुरज गोयल, लोकमान्य सोसायटीचे शुभम घावरे, कृषी व्यवस्थापक प्रिया गावडे, विषय तज्ञ प्राची राऊळ, व्यवसाय विकास तज्ञ श्रुती रेडकर यांच्यासह ग्रामसखी, प्रेरिका, वित्तीय साक्षरता समन्वयक, सर्व ग्रामसंघ लिपिक व प्रभागसंघाचे सदस्य उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचालन प्रभागसंघाच्या वित्तीय साक्षरता समन्वयक माधवी भोगण यांनी केले. अध्यक्षीय भाषणानंतर प्रभागसंघाच्या वतीने शमिका नाईक यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि सभेची अधिकृत सांगता करण्यात आली.












