कशेडी घाटात महामार्गाला धोका; रस्ता खचल्याने लोखंडी गर्डर हवेत, मोठ्या दुर्घटनेची भीती

खेड/रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी घाटातून चिंताजनक बातमी समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे महामार्गालगतचा साईड पट्टीचा भराव वाहून गेल्याने रस्ता खचला असून लोखंडी गर्डर हवेत लटकलेल्या अवस्थेत दिसत आहेत. त्यामुळे अवजड वाहतूक सुरू राहिल्यास किंवा पुन्हा जोरदार पाऊस झाल्यास महामार्गाचा काही भाग वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, कशेडी बोगद्याला पर्यायी असलेला हा जुना घाटमार्गही धोकादायक अवस्थेत आला असून, गेल्याच वर्षी या रस्त्याचे डांबरीकरण आणि नूतनीकरण करण्यात आले होते. या परिस्थितीमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.