उद्धव ठाकरेंवर रामदास कदमांचा घणाघात; “शिवसेना लाखो शिवसैनिकांची, कोणाचीही खासगी मालमत्ता नाही”

खेड (प्रतिनिधी) : शिवसेना नेते रामदास कदम यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत पक्षातील फुट, खासदारांची भूमिका आणि शिवसेनेच्या वारशाच्या मुद्द्यावरून निशाणा साधला. कायदा आणि संविधानाच्या चौकटीत घेतलेल्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
रामदास कदम म्हणाले की, कायद्यापेक्षा आणि संविधानापेक्षा कोणीही मोठे नाही. संविधानाने दिलेल्या दोन-तृतीयांश बहुमताच्या अधिकारानुसार खासदार किंवा लोकप्रतिनिधी वेगळा गट स्थापन करू शकतात. अशा गटाला लोकसभा अध्यक्ष किंवा संबंधित प्राधिकरणाकडून मान्यता मिळाल्यानंतर त्यांचा निर्णय कायदेशीर ठरतो. त्यानंतर त्या गटाने कोणत्या राजकीय पक्षासोबत जायचे किंवा कोणती भूमिका घ्यायची हा त्यांचा अधिकार असतो. त्यामुळे अशा परिस्थितीत कारवाईचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र आणि देशातील जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप करताना कदम म्हणाले की, संविधान आणि नियमांची साधी माहिती नसताना अशा प्रकारची विधाने करणे योग्य नाही. एकदा वेगळ्या गटाला वैधानिक मान्यता मिळाल्यानंतर त्यांच्यावर कोणतेही बंधन राहत नाही. त्यामुळे या विषयावर चुकीची माहिती पसरवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना ही केवळ उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांची नसून लाखो शिवसैनिकांच्या त्याग, संघर्ष आणि बलिदानातून उभी राहिलेली संघटना असल्याचेही कदम यांनी नमूद केले. अनेक शिवसैनिकांनी तुरुंगवास भोगला, अनेकांनी संघर्ष केला आणि आयुष्य पक्षासाठी वेचले. त्यामुळे शिवसेनेवर कोणाचाही एकाधिकार असू शकत नाही, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाचाही उल्लेख केला. बाळासाहेबांनी पक्ष चालविताना कार्यकर्त्यांना नेहमी सोबत घेतले, मात्र त्यांच्या निधनानंतर पक्षात हुकूमशाहीची पद्धत सुरू झाली आणि त्याचे परिणाम आज स्पष्टपणे दिसत असल्याचा दावा कदम यांनी केला. पक्षातील अनेक नेते, आमदार आणि खासदार दूर जाण्यामागे याच कार्यपद्धतीचा परिणाम असल्याचेही त्यांनी सूचित केले.
खासदारांना आणि आमदारांना धमक्या देणे, त्यांच्याविरोधात आक्रमक भाषा वापरणे किंवा त्यांच्या घरांवर हल्ले करण्याची भाषा करणे लोकशाहीला शोभणारे नसल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. लोकप्रतिनिधींना मतदारसंघात जाऊ देणार नाही किंवा त्यांना रोखून धरू अशा प्रकारची वक्तव्ये लोकशाही व्यवस्थेला धरून नसल्याचे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे सांगत रामदास कदम म्हणाले की, महाराष्ट्र हा सुशिक्षित आणि कायद्याचे राज्य असलेला प्रदेश आहे. येथे धमक्या, दडपशाही आणि केवळ राजकीय आवेशातून केलेली वक्तव्ये चालत नाहीत. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, मात्र कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन कोणीही वागू शकत नाही. कायद्याचा दंडुका सर्वांसाठी समान असून चुकीची भाषा आणि धमकावण्याचे प्रकार सुरू राहिल्यास कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.