कुमामे-गुरामवाडी येथे छापा ; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई
मालवण | प्रतिनिधी :ऑपरेशन ‘ऑल आऊट’ मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मालवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत १ लाख ८३ हजार १४५ रुपये किमतीची महाराष्ट्र बनावटीची अवैध दारू व बिअर जप्त केली. ही कारवाई दि. २८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.०० वाजण्याच्या सुमारास कुमामे, गुरामवाडी परिसरात करण्यात आली.
या प्रकरणी सीमा संदीप जगताप (वय ४८, रा. कुमामे, गुरामवाडी, ता. मालवण) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान संशयित आरोपीच्या ताब्यातून १,८३,१४५ रुपये किमतीची महाराष्ट्र बनावटीची दारू व बिअर जप्त करण्यात आली असून पुढील तपास मालवण पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. शेलार तसेच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईच्या पथकात सपोनि सुनील पाटील, पोलीस हवालदार बस्त्याव डिसोझा, विल्सन डिसोजा, आशिष जामदार तसेच महिला पोलीस शिपाई स्वाती सावंत यांनी सहभाग घेतला. ऑपरेशन ‘ऑल आऊट’ अंतर्गत अवैध मद्यविक्रीविरोधातील अशा कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.












