​दिव्यांग आणि दृष्टीहीन बांधवांच्या पाठीशी नगरपरिषद खंबीरपणे उभी राहील : सौ. श्रद्धा भोंसले

सावंतवाडीत ​राष्ट्रीय दृष्टीहीन संघ कोकण विभागाचा वर्धापन दिन उत्साहात

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप 

​सावंतवाडी : दिव्यांग आणि दृष्टीहीन बांधवांच्या पाठीशी नगरपरिषद कायम खंबीरपणे उभी राहील तसेच राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या कार्याला सर्वतोपरी मदत केली जाईल आणि सावंतवाडी शहरात संघटनेच्या स्वतंत्र कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असा विश्वास सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोंसले यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, महाराष्ट्र विभागीय शाखा कोकण यांच्या वर्धापन दिन सोहळ्यात अध्यक्षीय भाषणादरम्यान त्या बोलत होत्या.

​हा वर्धापन दिन सोहळा गुरुवारी सावंतवाडी येथे अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, पुरवठा अधिकारी दीपाली गोटे, समाजसेविका सौ. नानी कशाळीकर, केतन सावंत आणि डॉ. मनेश नाईक व्यासपीठावर उपस्थित होते.

​ ​दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगेश तळवणेकर आणि स्त्रीरोगतज्ज्ञ तथा उपजिल्हा रुग्णालयाचे सेवानिवृत्त अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या मुलांना शालेय वह्या, छत्र्या व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
​कार्यक्रमादरम्यान इयत्ता १० वी मध्ये ७० टक्के गुण मिळवल्याबद्दल विद्यार्थिनी अर्पिता दळवी हिचा तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच उमेश पेडणेकर या विद्यार्थ्याचाही यशोचित सत्कार करण्यात आला.

​ ​या सोहळ्यासाठी नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोंसले यांनी हॉल आणि जेवणाची व्यवस्था मोफत केली होती. डॉ. मनेश नाईक यांच्याकडून अल्पोपहार तर गौरव डेकोरेटर्सचे गौरव दळवी यांनी मोफत साऊंड सिस्टीम उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपली.

​विशेष म्हणजे, तहसीलदार श्रीधर पाटील आणि पुरवठा अधिकारी दीपाली गोटे यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणीच अंध-अपंगांसाठी आवश्यक दाखले देणे व अंत्योदय योजनेत नावे समाविष्ट करणे ही कामे जागेवरच पूर्ण करून दिली.
​या प्रसंगी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ कोकण शाखेचे अध्यक्ष बाबुराव गावडे, महासचिव शेखर आळवे, खजिनदार नंदा सावंत, सहसचिव प्रकाश वाघ, सहसचिव शाम माजगावकर, उपाध्यक्ष संतोष दळवी, उपाध्यक्ष सदानंद पावले, प्रशांत कदम, सुरेश दामले, वामन बिर्जे, शेजल आळवे, रंजना देसाई, काशिबाई दळवी, सविता गावडे, मंदार आळवे यांच्यासह शेकडो अंध बांधव आणि त्यांची शाळकरी मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती.