गगनबावडा प्रतिनिधी प्रतापसिंह काळे
रस्ते अपघात किंवा नैसर्गिक आपत्ती घडल्यानंतर जखमी व्यक्तीला पहिल्या एका तासात म्हणजेच ‘गोल्डन अवर’ मध्ये वैद्यकीय मदत मिळाली, तर त्याचा जीव वाचण्याची शक्यता अनेकपटींनी वाढते. हीच संकल्पना प्रत्यक्षात उतरवत गगनबावडा पोलीस स्टेशनच्या पुढाकारातून स्थापन झालेला ‘गगनबावडा जीवनदूत ग्रुप’ आज तालुक्यातील नागरिकांसाठी आशेचा किरण ठरत आहे.
सहा. पोलीस निरीक्षक भारत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या उपक्रमात सध्या २५० ते ३०० स्वयंसेवी सदस्य कार्यरत आहेत. सामाजिक भान असलेले नागरिक, पत्रकार, विविध विभागातील अधिकारी, तरुण, वाहनचालक आणि ग्रामस्थ या समूहात सहभागी झाले असून, कोणतीही आपत्कालीन घटना घडताच हे सदस्य मदतीसाठी तत्काळ घटनास्थळी धाव घेतात.
आजपर्यंत या समूहाने २० ते २५ गंभीर अपघातांमध्ये मदत केली असून, दोन ते तीन गंभीर जखमी प्रवाशांचे प्राण वाचवण्यात या उपक्रमाला यश आले आहे. अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोहोचविणे, अडकलेली वाहने बाहेर काढणे, रस्त्यावर पडलेली झाडे हटविणे, वाहतूक सुरळीत करणे तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रशासनाला सहकार्य करणे, अशी विविध कामे जीवनदूत ग्रुपचे सदस्य स्वयंस्फूर्तीने करत आहेत.
या ग्रुपची सर्वात मोठी ताकद म्हणजे सामूहिक प्रतिसाद व्यवस्था. एखादा अपघात घडल्यानंतर घटनास्थळाचा फोटो आणि थोडक्यात माहिती ग्रुपवर टाकली जाते. जवळपास असलेले सदस्य काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू करतात. त्यामुळे रुग्णवाहिका येईपर्यंतचा अमूल्य वेळ वाचतो आणि जखमींना वेळेत उपचार मिळतात.
अपघातग्रस्तांना मदत करण्यास अनेक नागरिक पूर्वी घाबरत होते. कारण मदत करणाऱ्यांनाच नंतर साक्षीदार किंवा फिर्यादी म्हणून कोर्ट-कचेऱ्यांचे हेलपाटे मारावे लागत होते. मात्र आता अशा मदतकर्त्यांना अनावश्यक कायदेशीर प्रक्रियेत न अडकविण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून केला जात असल्याने नागरिकांचा सहभाग वाढू लागला आहे. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचविण्यात या उपक्रमाला यश मिळत आहे.
हा उपक्रम कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला असून, यापूर्वी नागपूरमध्येही अशाच प्रकारचा उपक्रम राबविण्यात आला होता. गगनबावडा सारख्या दुर्गम, घाटमाथ्यावरील भागात वैद्यकीय मदत पोहोचण्यास वेळ लागत असल्याने अशा ठिकाणी हा प्रयोग अधिक प्रभावी ठरत आहे.यापुढे रस्त्यालगतच्या गावांमध्ये फर्स्ट एड किट उपलब्ध करून देण्याचा मानसही पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे. नागरिकांचा सहभाग आणि प्रशासनाचे समन्वय यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
गगनबावडा जीवनदूत ग्रुप हा केवळ एक व्हॉट्सॲप ग्रुप नाही, तर संकटात धावून येणाऱ्या संवेदनशील माणसांचा परिवार बनला आहे. अपघाताच्या क्षणी ओळख, जात, धर्म किंवा स्वार्थ न पाहता “माणूस वाचला पाहिजे” या एका ध्येयाने धावणारे हे जीवनदूत समाजात मानवतेचा नवा आदर्श निर्माण करत आहेत.











