नेरूर येथील उपकेंद्राचे लोकार्पण झाले पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत
कुडाळ, ( प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे उपकेंद्र अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी नेरूर येथे केले
कुडाळ तालुक्यातील नेरूर येथे नवनिर्माण झालेल्या आरोग्य उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, आरोग्य सभापती रितेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी पडते, सभापती मिलिंद नाईक, जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे, दीपक नारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, संजय पडते, काका कुडाळकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे यांनी आमदार निलेश राणे यांच्या आग्रहाखातर आपण या सोहळ्यास उपस्थित असल्याचे सांगत त्यांच्या विकासकामांचे भरभरून कौतुक केले.
ते म्हणाले की, खासदार नारायण राणे यांचे नेहमीच हे स्वप्न होते की, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्यसेवा इतकी उत्तम असावी की येथील रुग्णाला उपचारासाठी कोल्हापूर किंवा गोव्याला जाण्याची गरज भासू नये. यासाठी त्यांनी नेहमी आरोग्य यंत्रणेला प्राधान्य दिले. महायुती सरकार ग्रामीण भागात सर्वोत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे. असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
दर्जेदार वास्तू आणि आगामी विकासकामे
आमदार निलेश राणे यांनी आपल्या भाषणात आरोग्य यंत्रणेच्या विकासावर भर दिला. ते म्हणाले, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत उभारण्यात आलेल्या या सुंदर व दर्जेदार वास्तूचे नेरूरनंतर आता मसुरे येथील उपकेंद्राचेही लवकरच लोकार्पण होणार आहे.
वास्तूच्या देखभालीवर भर देताना ते म्हणाले की, “आरोग्य यंत्रणेत पदे भरण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी मागणी केली आहे. उत्तम इमारत उभारली असून तिची निगा राखणेही तितकेच गरजेचे आहे.” तसेच, या उपकेंद्राकडे येणारा रस्ता चढणीचा असल्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी त्या रस्त्याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले. आरोग्य सभापती व सदस्यांनी या वास्तूची काळजी घेणे म्हणजे जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे असल्याचे ते म्हणाले.
प्रस्तावांची आणि विकासकामांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी आपल्या मनोगतात उपकेंद्राच्या प्रवासाचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले की, 2013 मध्ये या आरोग्य उपकेंद्राचे टेंडर काढण्यात आले होते. १३०० चौरस फुटांच्या या बांधकामासाठी ५५ लाखांचे अंदाजपत्रक असताना प्रत्यक्षात ४४ लाख रुपये खर्च आला.
आरोग्य यंत्रणेच्या विस्ताराबाबत माहिती देताना ते म्हणाले की, १७ सब सेंटर आणि १८ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा प्रस्ताव खासदार नारायण राणे यांच्याकडे देण्यात आला असून, त्यांनी यासाठी १० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रशासकीय आदेशाची पूर्तता झाल्यानंतर ही कामे लवकरात लवकर सुरू होतील. आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनुसार नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी आरोग्य विभागात वाढ केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.












