दापोली | विशेष प्रतिनिधी :
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मांदिवली गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ५० एकरांवरील बांबू लागवड प्रकल्पाला रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी भेट देत प्रकल्पाची सविस्तर पाहणी केली. यावेळी दापोलीचे गट विकास अधिकारी गणेश मंडलिक उपस्थित होते. दोन्ही अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची माहिती घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि बांबू शेतीच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना देण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
कार्यक्रमाची सुरुवात ग्रामसेवक पोपट भोरजे यांच्या प्रस्तावनेने झाली. गावातील शेतकऱ्यांनी उपस्थित मान्यवरांचे बांबूपासून तयार केलेल्या आकर्षक भेटवस्तू देऊन स्वागत केले. त्यानंतर वैदेही रानडे आणि गणेश मंडलिक यांनी शेतकऱ्यांसमवेत प्रत्यक्ष बांबूची लागवड करून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी भावेश कारेकर यांनी मंडणगड आणि दापोली तालुक्यात मिळून २,००० एकरांहून अधिक क्षेत्रावर बांबू लागवड करून त्यावर आधारित उद्योग उभारण्याचा संकल्प व्यक्त केला. बांबू शेतीमुळे हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यास मदत होईल, तसेच ग्रामीण भागात शाश्वत उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील, स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि पर्यावरणपूरक विकासाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मयुरेश जाळगावकर आणि केतन निंबरे हे सातत्याने शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून लागवडीचा पाठपुरावा करत आहेत. तसेच किसन निंबरे, अरुण भानत, जयेश शिगवण, धोंडू सावंत, नागेश सावंत, दिलीप सावंत, रंजना सावंत, लक्ष्मी केसरकर, वंदना सावंत यांच्यासह गावातील अनेक महिला व पुरुष शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सक्रिय योगदान देत आहेत.
मांदिवली गावात टप्प्याटप्प्याने ५०० एकरांवर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात ५० एकर क्षेत्रावर ७,५०० बांबूची रोपे लावण्याचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पामुळे भविष्यात बांबूवर आधारित उद्योगांना चालना मिळण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी शेतकऱ्यांच्या पुढाकाराचे विशेष कौतुक केले. बांबू शेती ही पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाला सामोरे जाणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रभावी माध्यम ठरू शकते. शाश्वत विकासाच्या दृष्टीने मांदिवली गावाने उचललेले हे पाऊल इतर गावांसाठीही प्रेरणादायी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मांदिवली गावाने हरित विकास, शाश्वत शेती आणि आत्मनिर्भर भविष्याच्या दिशेने सुरू केलेला हा उपक्रम ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.












