शाहिरी लोककलेतील पहाडी आवाज हरपला; मुरादपूर येथील ज्येष्ठ लोककलावंत शाहीर आबा खेडेकर यांचे वृध्दापकाळाने दुःखद निधन

जाखडी, नमन आणि डफावरील गाण्यांना दिली वेगळी ओळख; आबांनी वयाच्या ८५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

देवरूख (प्रतिनिधी)

कोकणच्या मातीत रुजलेल्या जाखडी, कलगीतुरा आणि नमन या पारंपरिक लोककलांमध्ये आपल्या पहाडी आवाजाने वेगळी ओळख निर्माण करणारे संगमेश्वर तालुक्यातील मुरादपूर येथील ज्येष्ठ लोककलावंत शाहीर आबा खेडेकर यांचे आज वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. मुरादपूर येथील राहत्या घरी दुपारी १२ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने शाहिरी आणि कोकणच्या लोककला क्षेत्रातील एक पहाडी आवाज कायमचा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

शाहीर आबा खेडेकर हे नाव कलगीतुरा अर्थात जाखडीच्या क्षेत्रात मोठ्या सन्मानाने घेतले जात होते. नमन ही पारंपरिक लोककला घराघरांत पोहोचविण्यातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. डफावरील गाणी आणि आपल्या भारदस्त, पहाडी आवाजातील सादरीकरण हे त्यांचे खास वैशिष्ट्य होते. केवळ चौथीपर्यंत शिक्षण झालेले असतानाही त्यांच्यातील उपजत प्रतिभेने लोककला क्षेत्रात त्यांना वेगळी उंची मिळवून दिली. त्यांनी अनेक पदांची रचना केली आणि ती आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजात सादर केली. वासुदेव मुंगळे घराण्यातील तुरेवाले शाहीर म्हणून त्यांचा मोठा नावलौकिक होता. रत्नागिरी आकाशवाणीवरही त्यांनी अनेक वर्षे डफावरील गाणी सादर केली. त्यामुळे त्यांचा पहाडी आवाज कोकणातील गावागावांसह असंख्य रसिकांपर्यंत पोहोचला.

पारंपारिक लोककलेबरोबरच सामाजिक प्रबोधनाच्या कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. महाराष्ट्र शासनाच्या साक्षरता व प्रौढ शिक्षण अभियानासह दारूबंदी आणि नशाबंदीच्या उपक्रमांत त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती केली. लोककलेचा उपयोग सामाजिक संदेश पोहोचविण्यासाठी त्यांनी प्रभावीपणे केला. चिपळूण येथे झालेल्या लोककला महोत्सवात, तसेच रत्नागिरी येथील पर्यटन महोत्सवात त्यांच्या लोककला क्षेत्रातील योगदानाचा विशेष गौरव करण्यात आला होता. त्यांना ‘रत्नागिरी भूषण’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. आयुष्यभर जाखडी, नमन, शाहिरी आणि डफावरील गाण्यांची परंपरा जपणाऱ्या आबा खेडेकर यांच्या निधनामुळे कोकणच्या लोककला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व अन्य परिवार आहे.