वाढदिवसानिमित्त आडेली पं. स. मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम
वेंगुर्ले : प्रतिनिधी
मनीष दळवी यांचे राजकीय भविष्यकाळ उज्ज्वल आहे. अगदी कमी वयात त्यांनी महत्त्वाच्या पदांवर सर्वोत्कृष्ट काम करून नेतृत्व कौशल्य सिद्ध केले आहे. जिल्हा बँकेच्या उन्नतीसाठी ते घेत असलेले कष्ट सर्वश्रुत आहेत. त्यामुळे भविष्यात ते निश्चित सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करायला प्रमुख दावेदार आहेत. वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे गावातील एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे याचा आम्हाला अभिमान आहे, असे गौरवोद्गार मठ येथे विविध मान्यवरांनी काढले.
जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त आडेली पंचायत समिती मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. याचाच एक भाग म्हणून पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर यांच्या पुढाकाराने आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रातील संपूर्ण स्टाफचा केशर जातीच्या आंबा कलमांचे वितरण करून सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, तुषार साळगावकर, तात्या कोंडंकर, सुधीर धुरी, आनंद फोंडकर, संतोष धुरी, संजू धुरी, प्रवीण गवंडकर, सत्यवान धुरी, उत्तम आडेलीकर, दाजी आडेलीकर, पांडुरंग आडेलीकर, साईनाथ तोरसकर, राजू खुशालकर, पांडुरंग गवंडकर आदी मान्यवर उपस्थित होते. विविध मान्यवरांनी यावेळी दळवी यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
वैद्यकीय अधिकारी डॉ. संजीवनी पाटील, आरोग्य सहाय्यक राजकुमार चव्हाण, औषध निर्माण अधिकारी रवींद्र कदम, आरोग्य निरीक्षक शेखर कांबळी, आरोग्य सहाय्यक प्रमिला भुजबळ, कनिष्ठ सहाय्यक अर्पिता मार्गी, कैलास वेंगुर्लेकर, मारुती शेंडे, विशाखा नाईक, रुग्ण भ्रमण माळी वनाजी वराडकर, अस्मिता नवर, तनया नाईककर, मनीषा दाभोलकर, रेश्मा धुरी, श्रीमती तोरसकर आदींना सन्मानित करण्यात आले.










