चतुरंग प्रतिष्ठान द्वारा चिपळूण-रत्नागिरीत शरद पोंक्षेंची लक्षवेधी व्याख्याने

रत्नागिरी :सद्य परिस्थितीवर परखडपणे भाष्य करणाऱ्या आणि आपले स्पष्ट मत रोखठोकपणे मांडण्यासाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या शरद पोंक्षे यांची व्याख्याने ऐकण्याची, अनुभवण्याची सुसंधी कोकणवासीय श्रोत्यांना येत्या आठवड्यातच मिळणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व रसिक श्रोत्यांसाठी भारताचे स्वातंत्र्य : काल, आज आणि उद्या या विषयावर, तसेच खास महाविद्यालयीन युवकांसाठी चला, आता तुमची पाळी ! या शीर्षकाखाली चिपळूण आणि रत्नागिरी येथे ही व्याख्याने चतुरंग प्रतिष्ठानने आपल्या ‘स्वातंत्र्याचे पूर्वरंग’ आणि ‘श्रवणानंद’ या उपक्रमांतर्गत योजिली आहेत.

चतुरंग प्रतिष्ठान दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला स्वातंत्र्याचे पूर्वरंग या उपक्रमात कीर्तन, प्रवचन, व्याख्यान अश्या स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करीत असते. केवळ स्वातंत्र्यपूर्व काळातील हुतात्म्यांचे स्मरण करणे इतकाच मर्यादित उद्देश न ठेवता, ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेचा अर्थ काळाच्या कसोटीवर जाणून घेणे असा व्यापक उद्देश या उपक्रमामागे असतो. ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेचा सद्य परिस्थितीत लागणारा अन्वयार्थ लक्षात घेऊन त्याविषयीचे स्पष्टास्पष्ट विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी येत्या २२ व २३ ऑगस्ट रोजी ही व्याख्याने होणार आहेत.

मंगळवार दि.२२ऑगस्ट रोजी *चिपळूणमध्ये* सकाळी ११ वाजता डी. बी. जे. महाविद्यालय येथे (फक्त महाविद्यालयातील युवकांसाठी) आणि संध्याकाळी ६ वाजता ब्राह्मण सहाय्यक संघ येथे (सर्व उत्सुक रसिक श्रोत्यांसाठी) अशी दोन व्याख्याने होतील. तर बुधवार दि.२३ ऑगस्ट रोजी *रत्नागिरीत* सकाळी ११:३० वाजता गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे (फक्त महाविद्यालयातील युवकांसाठी) आणि संध्याकाळी ६:१५ वाजता रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय येथे ( सर्व उत्सुक रसिक श्रोत्यांसाठी) अशा आणखी दोन व्याख्यानांचे आयोजन केले आहे.

लोकप्रिय, लोकमान्य वक्ता असा लौकिक प्राप्त केलेल्या श्री. शरद पोंक्षे यांचे निर्भिड वक्तृत्व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी काळात ऐकण्यासाठी सजग व उत्सुक अशा सर्व श्रोत्यांनी या सायंकालीन वेळेतल्या व्याख्यानांना आवर्जून यावे असे आवाहन चतुरंग संस्थेने आपल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे.