महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी रोखण्यासाठी गोवा सरकार सकारात्मक
सिंधुदुर्ग, : महाराष्ट्रात १५ ऑगस्टपर्यंत लागू असलेल्या मासेमारी बंदीच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
ना. नितेश राणे यांनी महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या मासेमारी बंदीची माहिती देत, या कालावधीत गोवा सरकारने महाराष्ट्राला पूर्ण सहकार्य करावे, तसेच गोव्यातील कोणत्याही मच्छीमाराकडून महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत येऊन मासेमारी केली जाणार नाही, यासाठी आवश्यक दक्षता घेण्याची विनंती केली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्राला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या सहकार्याबद्दल ना. नितेश राणे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मनःपूर्वक आभार मानले.
महाराष्ट्र आणि गोवा सरकारच्या समन्वयामुळे मासेमारी बंदीची प्रभावी अंमलबजावणी होऊन सागरी मत्स्यसंपत्तीच्या संवर्धनाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास ना. नितेश राणे यांनी व्यक्त केला.










