फूटपाथ कोसळला जेसीबीमुळे; दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कोणाची?

अतिक्रमण हटाव मोहिमेनंतरही उपजिल्हा रुग्णालयासमोरील फूटपाथ बंदच

सुरक्षित मार्ग केव्हा उपलब्ध होणार पादचारी करतायत सवाल ?

कणकवली : उपजिल्हा रुग्णालयासमोरील अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटविण्यासाठी जेसीबी थेट फूटपाथवर चढविण्यात आला होता. या कारवाईदरम्यान फूटपाथचा काही भाग कोसळल्याने पादचाऱ्यांसाठी हा मार्ग बंद करण्यात आला.

 

कारवाईदरम्यान चित्रीकरण सुरू असताना संबंधित अधिकाऱ्यांनी या नुकसानीची दखल प्रशासन घेईल व आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे सांगितले होते. मात्र, अद्यापही कोसळलेल्या फूटपाथची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

 

सध्या त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाची पट्टी बांधून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे फुटपाथवरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य पादचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. जेसीबीमुळे नुकसान झालेल्या फूटपाथची दुरुस्ती नेमकी कोण करणार, याची जबाबदारी कोणत्या विभागावर आहे, तसेच हा फूटपाथ पादचाऱ्यांसाठी पुन्हा सुरळीत केव्हा खुला होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आता यावर प्रशासन कोणती ठोस कार्यवाही करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.