संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान;

सुरक्षित रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडले

देवरुख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील साडवली (नैदरवाडी) येथे ५ ऑगस्ट रोजी सकाळी एका खाजगी विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने तत्परता दाखवत सुरक्षितपणे बाहेर काढले. या थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०० वाजण्याच्या सुमारास साडवली येथील रहिवासी श्री. राजेश पर्शराम चव्हाण यांच्या खाजगी विहिरीमध्ये एक बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले. सुमारे ५ x १२ फूट रुंद आणि २० फूट खोल असलेल्या या आयताकृती विहिरीत बिबट्या पाण्याच्या आठवड्याचा (कड्याचा) आधार घेऊन पोहत होता. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने याची माहिती वनविभागाला दिली.

घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर-देवरुख परिमंडळ वन अधिकारी व कर्मचारी आवश्यक साहित्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिस्थितीची पाहणी केल्यानंतर वनविभागाच्या पथकाने लोखंडी पिंजऱ्याला दोरी बांधून तो विहिरीत सोडला. काही क्षणांतच बिबट्या स्वतःहून पिंजऱ्यात शिरला आणि त्याला सुरक्षितपणे विहिरीबाहेर काढण्यात आले.
वैद्यकीय तपासणी अन् सुटका
रेस्क्यू केल्यानंतर पशुसंवर्धन तालुका लघु चिकित्सालय (देवरुख) येथील सहायक आयुक्तांकडून बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बिबट्या पूर्णपणे सुस्थितीत आणि निरोगी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला सन्मानाने त्याच्या नैसर्गिक अधिवासात (जंगलात) मुक्त करण्यात आले.

हे यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन विभागीय वन अधिकारी (रत्नागिरी-चिपळूण) श्रीमती गिरीजा देसाई, सहायक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड आणि परिक्षेत्र वन अधिकारी श्री. विक्रम गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
या मोहिमेत वनपाल (संगमेश्वर-देवरुख) श्री. सागर गोसावी, वनरक्षक सहयोग कराडे (साखरपा), आकाश कडुकर (फुणगूस), सुरज तेली (आरवली), सुप्रिया काळे (दाभोळे) तसेच प्राणीमित्र अनुराग आखाडे यांनी मोलाची कामगिरी बजावली. या वेळी साडवलीचे पोलीस पाटील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते; त्यांचेही सहकार्य या मोहिमेत लाभले.