दोडामार्ग : प्रतिनिधी
तालुक्यातील आयी – हरिजनवाडी येथील एका ३७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बाबुराव संतोष जाधव (वय ३७) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत दोडामार्ग पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार, ४ ऑगस्टच्या रात्री ९.३० वाजता बाबुराव जाधव हे झोपायला गेले. बुधवारी पहाटे ४.३० वाजता ते गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांना तातडीने दोडामार्ग येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या घटनेबाबत मयताची आई सुलोचना संतोष जाधव (वय ६०) यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात माहिती दिली. दोडामार्ग पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मानसी गावडे करत आहेत. बाबुराव यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.












