भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

 

रत्नागिरी : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे बुधवारी संध्याकाळी प्रवासादरम्यान आलेल्या हृदयविकाऱ्याच्या झटक्याने निधन झाले.

राजेश सावंत हे त्यांच्या मित्रांसमवेत जिल्ह्याबाहेर गेले होते. बुधवार संध्याकाळी ते घरी परतत असताना पाली दरम्यान त्यांना प्रवासातच हृदय विकाराचा तीव्र धक्का बसला. त्यांना तातडीने पाली रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.
राजेश सावंत हे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत राजकारणात आले.उदय सामंत यांच्या पहिल्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा होता. काही काळ ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यानंतर पालकमंत्री सामंत यांच्यासोबत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता तर त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी  काही काळ काम केले होते.
मात्र सध्या ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते.उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून त्यांची ओळख होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने रत्नागिरी जिल्ह्यांत हळहळ व्यक्त होत आहे.