देवगड, प्रतिनिधी : कुणकेश्वर येथील खालचीवाडी परिसरातील रहिवासी चेतन मोहन परब (वय ३५) यांचा समुद्रात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बुधवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, चेतन परब हे आपल्या मित्रासह कुणकेश्वर-मिठमुंबरी मार्गालगत समुद्रकिनारी कुरल्या (खेकडे) धरण्यासाठी गेले होते. यावेळी समुद्रकिनाऱ्यावर त्यांचा अचानक पाय घसरला. त्या वेळी समुद्रात मोठ्या लाटा असल्याने ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे कुणकेश्वर परिसरात शोककळा पसरली आहे. चेतन परब यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक लहान मुलगा असा परिवार आहे.












