नागरिक, व्यापारी, वाहन चालक यांच्यासाठी त्रासदायक ठरणाऱ्या २५ गुरांची रवानगी गोशाळेत

गुरे मालकांच्या असहकार्य भूमिकेमुळे लांजा नगरपंचायतीचा कठोर निर्णय

संतोष कोत्रे
लांजा-: लांजा शहरातील व्यापारी, नागरिक, विद्यार्थी आणि वाहन चालक यांच्यासाठी त्रासदायक ठरणाऱ्या आणि नगरपंचायतीने पकडलेल्या २५ भटक्या गुरांची रवानगी चिपळूण येथील गोशाळेत करण्यात आली आहे. गुरे मालकांच्या असहकार्य भूमिकेमुळे नगरपंचायत प्रशासनाने हा कठोर निर्णय घेतला आहे.
लांजा शहर परिसरातील नागरिकांची गुरे ही मोकाटपणे लांजा बाजारपेठ, महामार्गावर बिनधास्तपणे बसून असतात. त्यांचा उपद्रव हा बाजारपेठेतील व्यापारी ,मंगळवारच्या आठवडा बाजारातील बाहेरून येणाऱ्या व्यापारी, शहरातील नागरिक, विद्यार्थी आणि महामार्गावरून प्रवास करणारे वाहन चालक यांना सहन करावा लागतो. या भटक्या गुरांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात देखील शहरात झालेले आहेत. त्यामुळे ही भटकी गुरे सर्वांच्याच दृष्टीने डोकेदुखी बनली होती. यापूर्वी नगरपंचायतीकडून भटक्या गुरांची धरपकड करण्यात आली होती. मालकांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर काही दिवसानंतर पुन्हा ही गुरे बाजारपेठेत येतात .
या पार्श्वभूमीवर लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ. सावली कुरूप, स्वच्छता समिती सभापती तथा उपसभापती मिलिंद उर्फ बाबा लांजेकर आणि मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी शहरात मोकाटपणे फिरणाऱ्या २५ गुरांची धरपकड केली होती. त्यानंतर ही गुरे नगरपंचायतीच्या सभागृहाच्या ठिकाणी बांधून ठेवण्यात आली होती. आठ ते दहा दिवस नगरपंचायतीकडून या गुरांना चारापाणी देऊन त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच संबंधित गुरे मालकांना आपली गुरे घेऊन जाण्यासाठी घंटागाडीच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले होते. नोटीस बोर्डवर सूचना देण्यात आली होती.
त्यानंतर काही गुरे मालक आले देखील होते. मात्र दोन हजार रुपयांचा दंड पाहून आमची गुरे दोन हजार रुपयांच्या किमतीची नाहीत. तुम्हाला काही कारवाई करायची असेल तर करा अशा प्रकारची सांगितले होते. अशाप्रकारे नागरिकांच्या असहकार्य भूमिकेमुळे नगरपंचायतीने अखेर कठोर निर्णय घेतला असून पकडलेल्या सर्व गुरांची गोशाळेत रवानगी करण्यात आली असल्याचे स्वच्छता सभापती बाबा लांजेकर यांनी सांगितले.

चौकट-: लांजा शहरात फिरणाऱ्या भटक्या गुरांची गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे हा निर्णय लांजावासीयांच्या हितासाठी घेण्यात आलेला आहे. यापुढेही गुरे मालकाने आपली गुरे लांजा बाजारपेठेत फिरणार नाहीत याची काळजी घ्यावी, आणि नगरपंचायतीला सहकार्य करावे. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा स्वच्छता सभापती बाबा लांजेकर यांनी दिला आहे.