‘सम्राट संगीत सभेत’ रंगणार ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ विजेता हर्ष नकाशे यांचे सुरेल गायन

 

सावंतवाडी l प्रतिनिधी:

मये, गोवा येथील सम्राट क्लबतर्फे येत्या गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:०० वाजता ‘सम्राट संगीत सभेचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा संगीतमय कार्यक्रम गावकारवाडा, मये-डिचोली येथील श्री महामाया मंदिर सभागृहात पार पडणार आहे.

या विशेष संगीत सभेत सिंधुदुर्गचा सुपुत्र आणि ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ या मानाच्या स्पर्धेचा विजेता कु. हर्ष नकाशे हा आपल्या सुश्राव्य व सुरेल गायनाने उपस्थित संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहे. या कार्यक्रमात त्याला कु. उत्कर्षा फोंडेकर यांची हार्मोनियमवर आणि कु. मिलिंद परब यांची तबल्यावर साथसंगत लाभणार आहे.

गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगीतप्रेमींसाठी ही संगीत सभा म्हणजे एक अपूर्व पर्वणी ठरणार आहे. या सोहळ्याला सर्व संगीतप्रेमींनी व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संगीतमय मैफिलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन सम्राट क्लब, मयेचे अध्यक्ष नरेश पेडणेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.