भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांना साश्रू नयनांनी निरोप

रत्‍नागिरी :
कोकणातील राजकीय आणि सामाजिक पटलावर आपल्या कर्तृत्वाने एक वेगळा वसा निर्माण करणारे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश विनायक सावंत यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण रत्नागिरी शोकसागरात बुडाली. गुरुवारी दुपारी स्टेट बँक कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानावरून अंत्ययात्रा निघाली यावेळी हजारो नागरिक व विविध राजकीय पक्षांचे, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील पदाधिकारी उपस्‍थित होते.

भाजपाचे माजी जिल्‍हाध्‍यक्ष राजेश सावंत यांचे बुधवारी रात्री कोल्‍हापूरहून रत्‍नागिरीत येत असताना ह्दयविकाराच्‍या झटक्‍याने निधन झाले. ते 55 वर्षांचे होते. गुरुवारी त्‍यांच्‍या अंत्‍ययात्रेला संपूर्ण जिल्‍ह्यातून विविध पक्षांचे पदाधिकारी दाखल झाले होते. स्टेट बँक कॉलनीवरून निघून ही अंत्ययात्रा मारुती मंदिर, जिल्हा रुग्णालय आणि नगर परिषद या मार्गावरून मार्गस्थ झाली. जेव्हा अंत्ययात्रा नगर परिषदेजवळ आली, तेव्हा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या लाडक्या पदाधिकार्‍याचे अंतिम दर्शन घेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. मिरकरवाडा येथील स्मशानभूमीत गुरुवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी त्‍यांच्‍या कन्‍येने मुखाग्‍नी दिला.
यावेळी माजी आमदार सुभाष बने, राजन साळवी, बाळ माने यांच्‍यासह भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, सतीश मोरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रसाद सावंत, किरण तोडणकर, शेखर घोसाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ, शिवसेना तालुकाप्रमुख बाबू म्हाप, बंड्या साळवी, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, सेना-भाजपचे आदरणीय नगरसेवक, चिपळूण भाजप शहराध्यक्ष शशिकांत मोदी, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांच्यासह जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रमुख आणि हजारो नागरिक उपस्थित होते. राजेश सावंत यांच्या निधनाने रत्नागिरीने एक अभ्यासू, दिलदार आणि सर्वपक्षीय सलोखा राखणारा नेता गमावला असून, ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. त्‍यांच्‍या पश्‍च्‍यात वडील, पत्‍नी, दोन मुली, एक जावई असा परिवार आहे.
राजेश सावंत यांच्या निधनाची माहिती मिळताच आमदार किरण उर्फ भैय्या सामंत हे तात्काळ पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते बुधवारी रात्री उशिरा आमदार किरण सामंत आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन सावंत कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि दुःखाच्या या कठीण प्रसंगी आपण पाठीशी असल्याचा विश्वास दिला.