वैभववाडी येथे मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त स्पर्धेचे आयोजन
वैभववाडी प्रतिनिधी :
वैभववाडी येथे वीरसुपुत्र हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. या निमित्ताने विजय रावराणे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या जिल्हास्तरीय समरगीत गायन स्पर्धा आणि निबंध लेखन स्पर्धेला सिंधुदुर्ग जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
निबंध लेखन स्पर्धेसाठी ‘हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे : शौर्य, शिस्त आणि समर्पण’ हा विषय देण्यात आला होता. या स्पर्धेत कु. ऋतुजा संतोष मोरे हिने प्रथम क्रमांक पटकावला. शरदचंद्र सच्चिदानंद रावराणे यांनी द्वितीय, तर अन्वी चेतन गवाणकर हिने तृतीय क्रमांक मिळविला.
जिल्हास्तरीय समरगीत गायन स्पर्धेत रियाज बॅंड लाईव्ह, कणकवली यांनी प्रथम क्रमांक पटकावला. शिवाजी इंग्लिश स्कूल, पणदूर यांनी द्वितीय, तर नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल, नडगिवे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. तसेच आदर्श संगीत विद्यालय, कणकवली, श्री स्वामी समर्थ संगीत समूह, कणकवली आणि श्री कोटेश्वर संगीत साधना मंडळ, कणकवली यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके प्राप्त केली.
समरगीत गायन स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्रीधर पाचंगे, विकास नर आणि योगेश चव्हाण यांनी काम पहिले. निबंध लेखन स्पर्धेचे परीक्षण राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रा. एस. बी. शिंदे यांनी केले. मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून गीतगायन स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला.
यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, भैरी भवानी प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष समिर रावराणे, दिपक रावराणे, आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.आर.चव्हाण, मुख्याध्यापक भास्कर नादकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय रावराणे आणि मित्र मंडळ व शिक्षक मंदार चोरगे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार निलेश कारेकर यांनी केले.












