सावंतवाडी: दहावीच्या विद्यार्थ्यांना आगामी एसएससी बोर्ड परीक्षेत उत्तम यश मिळवता यावे या हेतूने मार्गदर्शन करण्यासाठी विशेष ॲपचे मोफत वितरण करण्यात आले. पुण्यातील सौ. आणि रो. अमोल कामत यांनी रोटरी क्लब, डोंबिवली सनसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेले हे ॲप कळसुलकर इंग्लिश स्कूल येथील ९० विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले. या उपक्रमात रोटरी क्लब डोंबिवली सनसिटी, रोटरी क्लब कणकवली सेंट्रल आणि रोटरी क्लब सावंतवाडी यांनी एकत्रित सहभाग नोंदवला.
कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना रो. अमोल कामत यांनी विद्यार्थ्यांना या ॲपचा सुयोग्य वापर करून परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण कसे मिळवता येतील याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. रोटरी क्लब डोंबिवली सनसिटीचे अध्यक्ष रो. डॉ. कैलास दातरांगे यांनी दहावीची परीक्षा ही आयुष्यातील यशाची महत्त्वाची पायरी असून या ॲपच्या माध्यमातून ती सहज आणि यशस्वीपणे कशी गाठता येईल, यावर आपल्या खुमासदार शैलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोटरी क्लब सावंतवाडीचे सचिव रो. सुहास सातोस्कर यांनी प्रास्ताविक केले. कळसुलकर इंग्लिश स्कूलचे प्राचार्य भुरे सर यांनी आभार मानताना हे ॲप विद्यार्थ्यांच्या अभ्यासात आणि आयुष्यात नक्कीच क्रांती घडवून आणेल असा विश्वास व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारंग सर यांनी केले.
या सोहळ्याला रोटरी क्लब सनसिटी डोंबिवलीचे सचिव निखिल आपटे, खजिनदार रो. अलंकार तायशेटे, रोटरी क्लब कणकवली सेंट्रलचे रो. नितीन बांदेकर आणि रो. वर्षा बांदेकर उपस्थित होते. तसेच रोटरी क्लब सावंतवाडीचे रो. प्रमोद भागवत, रो. दिलीप म्हापसेकर, रो. ॲड. सिद्धार्थ भांबुरे, रो. विनय काणेकर, रो. सुबोध शेलटकर आणि रो. प्रदीप शेवडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.












