सावंतवाडी:
लोकमान्य प्रा. मधु दंडवते रेल्वे टर्मिनस सावंतवाडी येथील नवीन इमारतीचे काम कोकण रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आले होते. मात्र, ही इमारत उभी राहिल्यास भविष्यात पाचव्या रुळाच्या उभारणीसाठी तसेच नवीन फलाटासाठी (प्लॅटफॉर्म) पुरेशी जागा शिल्लक राहणार नव्हती. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने ही गंभीर बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) संतोष कुमार झा यांची भेट घेऊन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेअंती सध्या सुरू असलेल्या इमारतीच्या कामाला १५ दिवसांची स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत माहिती देताना आमदार केसरकर म्हणाले की, पाचव्या क्रमांकाचा प्लॅटफॉर्म आणि टुरिस्ट फॅसिलिटीचे (पर्यटन सुविधा) काम एकाच वेळी हाती घेण्यात यावे, असे बैठकीत सुचवण्यात आले असून त्याला प्रशासनाने मान्यता दिली आहे. लवकरच रेल्वेची एक विशेष टीम या जागेची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. सावंतवाडीत एक सुसज्ज टर्मिनस आणि पाचवा प्लॅटफॉर्म अस्तित्वात आल्यानंतर येथे गाड्या थांबण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढेल. फलाट क्रमांक ४ वर पर्यटन सुविधा निर्माण करण्याचा सुरुवातीला प्रयत्न होता; परंतु कॉलमचे काम करताना केबल तुटून रेल्वे सेवा ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला असता. त्यामुळे हा निधी शेजारील जमिनीच्या विकासासाठी राखून ठेवण्यात आला असून तो सध्या अखर्चित आहे.
रेल्वे स्थानकात गाड्यांना मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नाबार्डकडून विशेष योजना मंजूर करून घेण्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. तिलारीच्या या योजनेतून मळगाव, न्हावेली, निरवडे आणि वेत्ये या गावांना पाणीपुरवठा केला जाणार असून, हे पाणी पुढे चीपी विमानतळापर्यंत पोहोचवले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय रेडी बंदराचा विकास होत असल्याने सावंतवाडी रेल्वे टर्मिनसवर यार्ड तयार करून इतर आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी कोकण रेल्वे महामंडळाने सकारात्मक तयारी दर्शवली आहे. पीपीपी तत्त्वावर हे काम केल्यास गुंतवणूकदार पुढे येण्यास तयार असून, यामुळे रेल्वे स्थानकावर अतिरिक्त सायडिंग उपलब्ध होईल. या संपूर्ण टर्मिनसच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी ५० टक्के गुंतवणुकीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
महामार्गावरील फ्लायओव्हरच्या प्रश्नावर मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे बैठकीची मागणी केली असून, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनाही या बैठकीस उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येणार आहे. सावंतवाडी स्थानकात ‘वंदे भारत’ रेल्वेसह अन्य महत्त्वाच्या गाड्यांना कायमस्वरूपी थांबा मिळावा आणि टर्मिनसचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी लवकरच दिल्लीत जाऊन रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे आमदार केसरकर यांनी सांगितले.
नवी मुंबई येथे कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांच्यासोबत सावंतवाडी टर्मिनसच्या ५ व्या प्लॅटफॉर्मबाबत पार पडलेल्या या महत्त्वाच्या बैठकीस संचालक (ऑपरेशन्स आणि कमर्शियल) सुनील गुप्ता, प्रिन्सिपल चीफ इंजिनिअर एल. प्रकाश, उपमुख्य कमर्शियल मॅनेजर (गुड्स) डी. जी. बोंडे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई येथे कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांच्याशी बैठक चर्चा करताना आमदार दीपक केसरकर व अन्य अधिकारी










