नाला प्रदूषण प्रकरणी खेर्डी एमआयडीसीत संयुक्त बैठक, ए संपमधून पाणी सुटणार नसल्यी लेखी हमी
चिपळूण (प्रतिनिधी):- सोनगाव येथील नाला प्रदूषणप्रकरणी गुरुवारी खेर्डी येथील एमआयडीसी कार्यालयात प्रशासन, उद्योग प्रतिनिधी आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक पार पडली. आंदोलनानंतर प्रथमच झालेल्या या बैठकीत सोनगाव ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. दोन्ही नाल्यांवर ऑनलाइन मॉनिटरींग यंत्रणा उभारणे, ‘ए’ संपमधून दूषित पाणी सोडले जाणार नसल्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून लेखी हमी देण्यात आली असल्यी माहिती आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आली.
या बैठकीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखिल घरत, उपप्रादेशिक अधिकारी श्रीपाद कुलकर्णी, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता सतीश पवार, उपअभियंता पिंपळे, हळदणकर, सीईटीपीचे व्यवस्थापक भूषण शिंदे, लोटे उद्योजक संघटनेचे अध्यक्ष राज आंब्रे यांच्यासह ठाकरे शिवसेनेचे विभागप्रमुख राजू घाग, पंचायत समिती सदस्या रेवती घाग, सोनगावच्या सरपंच भारती पडवळ, उपसरपंच मिलींद घोरपडे, पर्यावरण समितीचे अध्यक्ष विष्णू साळुंखे, उपाध्यक्ष संदीप घाग, प्रथमेश घाग, दत्ताराम घाग, दाभोळखाडी संघर्ष समितो सल्लागार दिलीप दिवेकर, प्रमोद माळी, शेखर मोरे, विनायक घाग, शंकर अदावडे आदी उपस्थित होते.
या बैठकीत सोनगावमधील दोन्ही नाल्यांवर ऑनलाइन वॉटर मॉनिटरींग सिस्टीम बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रणालीद्वारे नाल्यातील पाण्याच्या गुणवत्तेवर सतत ऑनलाइन देखरेख ठेवली जाणार असून प्रदूषणाची माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे. याशिवाय, ‘ए’ संपमधून कोणत्याही परिस्थितीत दूषित पाणी सोडले जाणार नाही, अशी लेखी हमी प्रदूषण नियंत्रण मंडळाने ग्रामस्थांना दिली. या हमीमुळे भविष्यात अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी प्रशासन अधिक जबाबदारीने काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, प्रदूषणामुळे बाधित झालेल्या शेतकरी, नागरिकांया नुकसान भरपाईबाबत सध्या कोणतीही स्पष्ट कायदेशीर तरतूद नसल्याचे अधिकाऱयांनी बैठकीत सांगितले. मात्र संबंधित उद्योग, एमआयडीसी आणि प्रशासनाशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
आंदोलनानंतर झालेल्या या बैठकीत तीन महत्त्वाच्या मुद्यांवर सकारात्मक निर्णय झाल्याने सोनगाव प्रदूषणप्रकरणी तोडग्याच्या दिशेने पहिले ठोस पाऊल पडल्याचे मानले जात आहे.












