बँक मॅनेजर आत्महत्या, संशयितांना अटकपूर्व जामीन

सिं.जि.म.स.बँक शाखा-मुणगे मध्ये रु.२७,७५,२०१/- चा अपहार उघडकीस

कोल्हापूर सर्कीट बेंच समोर अॅड. कौस्तुभ मराठे यांचा यशस्वी युक्तीवाद

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मुणगे येथील शाखा व्यवस्थापक कै. अविनाश काशिराम तळवडेकर याचा आर्थिक व मानसिक छळ करुन त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल असलेले फरार संशयित आरोपी अमोल नंदकिशोर कांदळगावकर व सुहास नारायण मालंडकर या दोघांनाही ना. मुंबई उच्च न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूर यांचेकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. याकामी आरोपींचे वतीने अॅड. कौस्तुभ मराठे यांनी सर्कीट बेंच समोर यशस्वी युक्तीवाद केला. त्यांना याकामी अॅड. मिहीर मोंडकर यांनी सहाय्य केले.

माहे सप्टेंबर २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहाकारी बँक शाखा-मुणगे मधील बँक खातेधारकांच्या खात्यांमधील तसेच बँकेतील एफ.डी. च्या रकमा परस्पर वळत्या करुन रु. २७,७५,२०१/- चा अपहार करण्यात आला होता. सदर अपहाराची संपूर्ण रक्कम संशयित आरोपींना देण्यात आली होती. सदर रक्कमेवर भरमसाट परतावा देण्याचे आमिष संशयित आरोपींकडून मयताला देण्यात आले होते.

तथापि मयताने वारंवार मागणी करुनही सदर खातेधारकांचे पैसे आरोपींनी परत केले नव्हते. संबंधित शाखेचे शाखा व्यवस्थापक अविनाश तळवडेकर यांनी आर्थिक फसवणुकीमुळे मानसिक तणावाखाली येऊन दि. २५/११/२०२५ रोजी आरे येथील कौल कारखान्यानजीकच्या तलावात उडी मारुन आत्महत्या केली होती.

यावेळेस मयताने मोटरसायकलचे डिकीमध्ये आरोपींचे नाव असलेली चिठ्ठी लिहून ठेवली होती. संशयित आरोपींवर बी.एन.एस. कलम १०८, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. देवगड पोलीस संशयितांचा शोध घेत होते. या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींचा जामीन नामंजूर करुन फेटाळला होता. तथापि मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्कीट बेंच समोर झालेल्या सुनावणीत आरोपींना देण्यात आलेला अंतरीम अटकपूर्व जामीन कायम करण्यात आला आहे.