देवधे- पुनस- रत्नागिरी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
संतोष कोत्रे
लांजा –: लांजा तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांना जोडणारा आणि एसटीसह अन्य खासगी वाहनांची सतत रहदारी असलेल्या देवधे- पुनस- रत्नागिरी मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तर याच मार्गावर पुनस शाळा ते चाफडे गादी पर्यंतच रस्ता हा वाहन चालक आणि प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनवून राहिला आहे.
त्यामुळे दुचाकी सारख्या वाहनांचे सात ते आठ छोटे-मोठे अपघात झालेले आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने एखाद्याचा जीव गेल्यानंतरच रस्त्याची दुरुस्ती करणार का? असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थांसह सरपंच संतोष लिंगायत यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, लोकांच्या जीविकास धोकादायक ठरलेल्या या रस्त्याची १५ ऑगस्ट पूर्वी डागडुजी करून रस्ता वाहतूक योग्य करावा, अन्यथा रस्त्यात झाडे लावण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच
पुढील काही दिवसात या विरोधात तीव्र जन आंदोलन पुकारण्याच्या निर्णयाप्रत ग्रामस्थ आले आहेत.
देवधे- पुनस- रत्नागिरी हा रस्ता अतिशय वर्दळीचा असून या रस्त्यावरून दररोज एसटीसह अन्य खाजगी वाहनांची सतत रहदारी असते. रत्नागिरी ला जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा आणि शॉर्टकट ठरत असल्याने या मार्गावरून वाहनांची सतत रहदारी असते. मात्र गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून या रस्त्याची सद्यःस्थितीत अतिशय दूरवस्था झाली आहे. विशेषतः पुनस शाळा ते चाफडे गादी पर्यंतच रस्ता खड्डेमय बनला आहे. खड्डे देखील एखादे वाहन अडकून पडेल इतके मोठे आहेत. त्यात पावसाचे पाणी साचून या रस्त्याला जणू तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने चालवताना वाहन चालकांची मोठी कसरत होत आहे.
मोठ्या प्रमाणातील खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे अनेक मोटरसायकलचे अपघात देखील झालेले आहेत. रस्त्यावर पडलेले खड्डे हे वाहनांच्या अपघातात कारणीभूत ठरत आहेत .एकूणच हा रस्ता वाहन चालकांसाठी अतिशय धोकादायक बनला असून तो मृत्यूचा सापळा बनला आहे.
एकूणच रस्त्याच्या झालेल्या या दुरावस्थेमुळे कोणी रस्ता करून देतो का? अशी आर्त साद आता येथील ग्रामस्थ घालत आहेत. याबाबत सरपंच संतोष लिंगायत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार पत्रव्यवहार करूनही त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे एखाद्या वाहनाचा अपघात होऊन त्यात एखाद्याचा बळी गेल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभाग जागा होणार का? रस्त्याच्या दुरावस्थेबाबत लोकप्रतिनिधींना ? काही देणे घेणे आहे की नाही? अशा संतप्त भावना येथील ग्रामस्थांतून व्यक्त होत आहेत.












