‘रानभाज्या सप्ताहा’तून जपली पारंपरिक चवीची समृद्ध संस्कृती
सावंतवाडी :
जि.प. प्राथमिक शाळा मळगाव ब्राह्मणआळी येथे नुकतेच रानभाज्या व औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनाचे विशेष आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये परिसरातील अनेक दुर्मिळ रानभाज्या आणि औषधी वनस्पतींचा समावेश करण्यात आला होता.
विद्यार्थ्यांनी आणलेल्या रानभाज्यांमध्ये प्रामुख्याने पेव, चुरन, कुरडू, टायकाळा, तेरा, अळू आणि शेवगा यांसारख्या भाज्यांचा समावेश होता. तसेच औषधी वनस्पतींमध्ये कोरफड, किरायता, तुळस, गवती चहा, अडुळसा आणि हळद अशा विविध गुणकारी वनस्पती प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. दळवी सर व उपशिक्षिका श्रीम. तळणकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना या सर्व वनस्पतींचे महत्त्व आणि त्यांचा दैनंदिन जीवनातील उपयोग सविस्तर समजावून सांगितला.
विद्यार्थ्यांमध्ये रानभाज्यांबद्दल आवड निर्माण व्हावी या उद्देशाने शाळेच्या वतीने ‘रानभाज्या सप्ताह’ हा अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत दररोज एका विद्यार्थ्याने घरातून एक रानभाजी बनवून आणायची असून इतर विद्यार्थ्यांनी त्याची चव घ्यायची आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने आणि उत्साहाने या उपक्रमात सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. दळवी सर, उपशिक्षिका श्रीम. तळणकर मॅडम, स्थानिक अंगणवाडी सेविका, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीम. सुप्रिया राऊळ तसेच उपाध्यक्ष श्रीम. रुपाली राऊळ मॅडम हे प्रमुख उपस्थित होते.












