प्रत्येक वॉर्डात वर्ग सुरू करण्याची नगरसेवकांची मागणी
सावंतवाडी : सावंतवाडीतील जिमखाना हॉल येथे आयोजित ८ दिवसीय निःशुल्क फिटनेस योग शिबिराचा सांगता सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आचार्य बाळकृष्ण जी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी नगरपरिषद, महाराष्ट्र योगशिक्षक संघ आणि फिटनेस योग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडलेल्या या सांगता सत्रात नागरिकांनी विक्रमी उपस्थिती दर्शवून शिबिराला उदंड प्रतिसाद दिला.
शिबिराच्या अंतिम दिवशी सकाळी ५:३० वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानचे संस्थापक प्रकाश तेंडोलकर, नगरसेवक प्रतीक बांदेकर आणि नगरसेविका सौ. सायली दुभाषी यांच्या शुभहस्ते योगशिक्षक शेखर बांदेकर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला फिटनेस युवा अकॅडमीचे जिल्हाध्यक्ष नारायण सावंत, फिटनेस योग अकॅडमीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. अनिल मेस्त्री, फिटनेस किड्स अकॅडमीचे जिल्हाध्यक्ष विशाल लातये, फिटनेस योग प्रचारक सौ. तृप्ती मालवणकर तसेच फिटनेस महिला अकॅडमीच्या जिल्हाध्यक्षा सौ. रसिका सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
योगाभ्यासानंतर आयोजित करण्यात आलेल्या प्राणायाम सत्रात सहभागी साधकांनी आपले मनोगत व्यक्त करत ८ दिवसांतील अनुभवांची देवाणघेवाण केली, ज्यामुळे उपस्थितांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला. शिबिरादरम्यान सर्व साधकांच्या आरोग्याची काळजी घेत दररोज अलवेरा ज्यूस, गुळवेल ज्यूस, हळदीचे दूध, आवळा, ज्येष्ठमध आणि घरी तयार केलेल्या पौष्टिक खाऊचे वाटप करण्यात आले. या शिबिराच्या ऑनलाइन सत्राच्या तांत्रिक व्यवस्थापनाची जबाबदारी नारायण सावंत आणि काशिनाथ पेडणेकर यांनी यशस्वीरीत्या सांभाळली.
या प्रसंगी बोलताना नगरसेवक प्रतीक बांदेकर यांनी सावंतवाडीतील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी फिटनेस योगचे वर्ग शहराच्या प्रत्येक वॉर्डमध्ये सुरू केले पाहिजेत, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल लातये यांनी केले, तर विनया तावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. शेवटी “योग करा, निरोगी रहा” या प्रेरणादायी संदेशाने शिबिराची यशस्वी सांगता झाली.












