सावंतवाडी:
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीवर माजी शिक्षण सभापती, माजी जिल्हा बँक संचालक आणि माजी जिल्हा अध्यापक संघ अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर यांची तज्ज्ञ सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी पालकमंत्री तथा बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार आणि आदेशानुसार ही अधिकृत निवड जाहीर केली.
माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरुनाथ पेडणेकर यांचा शिक्षण आणि सहकार क्षेत्रात मोठा दबदबा आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्षपद अनेक वर्षे अत्यंत यशस्वीपणे भूषवले असून, विविध शैक्षणिक प्रश्नांवर त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. याशिवाय सहकार क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
सध्या ते नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली संचलित विद्या विकास मंडळ, इन्सुली या शिक्षण संस्थेवर सचिव म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि प्रशासकीय पकड लक्षात घेता, जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीला त्यांच्या मार्गदर्शनाचा मोठा फायदा होणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षण, सहकार आणि राजकीय क्षेत्रासह सर्व स्तरातून त्यांचे जोरदार स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.












