अमित केतकर यांची मागणी
साखरपा :
आंबा घाटातील वाहतूक बंद पडल्यामुळे साखरपा आणि लगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांची रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी मोठी कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर, घाटातील रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत होईपर्यंत एसटी महामंडळाने ‘साखरपा ते रत्नागिरी’ अशी स्वतंत्र बस सेवा तातडीने सुरू करावी, अशी जोरदार मागणी जिल्हा नियोजन समिती विशेष निमंत्रित सदस्य अमित केतकर यांनी केली आहे.
साखरपा भागातून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या बहुतांश एसटी साखळी गाड्या या कोल्हापूर, सांगली, मिरज, जत, ईश्वरपूर, पुणे, अक्कलकोट, सोलापूर, बेळगाव, भूम आणि लातूर यांसारख्या दूरच्या भागांतून येत असतात. या मार्गावर स्थानिक (लोकल) बस फेऱ्यांचे प्रमाण आधीच अत्यंत मर्यादित आहे. आता आंबा घाट बंद झाल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक खंडित झाली आहे. परिणामी, साखरपा परिसरातून रत्नागिरीकडे जाण्यासाठी प्रवाशांकडे अत्यंत कमी पर्याय उरले असून, दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची, विद्यार्थ्यांची व रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.
या समस्येकडे लक्ष वेधताना अमित केतकर यांनी ‘प्रहार Digital ‘च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) प्रशासनाला आवाहन केले आहे. घाटातील अडचण दूर होईपर्यंत स्थानिक प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी महामंडळाने या मार्गावर विशेष आणि जादा फेऱ्या सुरू करून जनतेला दिलासा द्यावा, अशी आग्रही विनंती त्यांनी केली आहे.










